03 December 2020

News Flash

पाच वर्षांत पहिल्यांदाच मराठवाडय़ातील भूजल पातळीत वाढ

औरंगाबादमध्ये सर्वाधिक ५.१३ मीटरची वृद्धी

(संग्रहित छायाचित्र)

सततच्या दुष्काळामुळे मराठवाडय़ाची ‘टँकरवाडा’ अशी बनलेली ओळख या वर्षी अतिवृष्टीमुळे पुसली गेली असून गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्व तालुक्यात भूजल वाढ दिसून येत आहे. सप्टेंबरअखेर ८७५ निरीक्षण विहिरींच्या नोंदीची गेल्या पाच वर्षांतील सरासरी पाणीपातळीची तुलना केल्यानंतर त्यात ०.४० मीटरची वाढ दिसून आली आहे. भूगर्भातील पाणीपातळीमध्ये सर्वाधिक वाढ औरंगाबाद जिल्ह्य़ात ५.१३ मीटरची दिसून आली असून सर्वात कमी वाढ बीड जिल्ह्य़ात ०.४० एवढी दिसून आली आहे. एकाच ठिकाणी वेगाने पाऊस पडल्यामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र सरासरीपेक्षा २१५ टक्के अधिक पाऊस झाल्याने मराठवाडय़ातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहिले. तसेच, ऑक्टोबपर्यंत मोठा पाऊस झाल्याने पाणीपातळीतील वाढ निरीक्षण विहिरीच्या माध्यमातून दिसून आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठवाडय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २१५ टक्के पाऊस अधिक झाला. उस्मानाबाद जिल्ह्य़ात ही वाढ सर्वाधिक म्हणजे सरासरी ३७० टक्के एवढी होती. सप्टेंबरअखेरीपर्यंत लातूर जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा अधिक असणाऱ्या पावसाने ऑक्टोबरमध्ये कहर केला. मात्र,  भूगर्भातील पाणीपातळी मोजण्याची कार्यपद्धती सप्टेंबरअखेपर्यंतच असते. या वर्षी भूगर्भातील पाणीपातळी वर वाढेल हे सहज दिसण्यासारखे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत दुष्काळी भागात  ऊस पिकासाठी करण्यात आलेला उपसा लक्षात घेता तसेच पावसाचा वेग लक्षात घेता पाणी पातळीत किती वाढ होईल याविषयी तज्ज्ञांच्या मनातही शंका होत्या. निरीक्षण विहिरीतील आकडेवारीनुसार झालेली सरासरी वाढ दुष्काळी ओळख या वर्षी राहणार नाही. पाण्याचा दुष्काळ नसला तरी शेतकऱ्यांच्या हाती मात्र नेहमीप्रमाणे फारसे काही लागले नाही. त्यामुळे राज्य सरकारला किमान अडीच हजार कोटी रुपयांची मदत करावी लागणार आहे. सप्टेंबरअखेरीस पाणीपातळीच्या अहवालानुसार औरंगाबाद जिल्ह्य़ात सर्वाधिक ५.१३ , जालना जिल्ह्य़ात २.०६ , परभणीमध्ये १.८९, नांदेडमध्ये १.७९, लातूरमध्ये ०.९२, उस्मानाबादमध्ये २.८८, बीडमध्ये ०.४०, हिंगोलीमध्ये १.४० मीटरने वाढ झाली आहे. आष्टी, पाटोदा, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा, लातूर येथील पाणीपातळीत सतत घट झालेली होती. मात्र सप्टेंबरमध्ये पावसाने चित्र बदलले आणि ऑक्टोबरमध्ये तर कहरच केल्याचे दिसून येत आहे.

एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी म्हणजे ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या महसूल मंडळाच्या नोंदीही महसूल प्रशासनाने घेतलेल्या आहेत. त्यानुसार २०१९ मध्ये २१२ महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली होती, तर या वर्षीच्या सप्टेंबरअखेरीस ३७५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी सर्वदूर वाढल्याचे दिसून येत आहे. काही तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सात मीटपर्यंत पाणीपातळी वाढली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांतील पाणीपातळीच्या सरासरी नोंदी उणे असल्याने या वर्षीची वाढ कमी होत आहे.

मांजरा धरण १०० टक्के भरले

लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्य़ांसाठी वरदान ठरलेल्या धनेगाव येथील मांजरा धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला असून धरण क्षेत्रात पाऊस पडला तर कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालवा काठावरील शेतकरी व वस्ती करून राहिलेल्यांनी सावध राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ९९.५८ टक्के होता. दुपारी दोन वाजता धरण १०० टक्के भरले. धरणाची पूर्ण संचयपातळी ६४२.३७ मीटर इतकी असून प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९ दलघमी इतका आहे. १९८० मध्ये मांजरा धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. गेल्या ४० वर्षांत फक्त १३ वेळा हे धरण पूर्ण भरले व या वर्षी ही चौदावी वेळ आहे. धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:14 am

Web Title: for the first time in five years the groundwater level in marathwada has increased abn 97
Next Stories
1 खडसेंनंतर पंकजा यांची कोंडी
2 पंकजा मुंडे- सुरेश धस यांच्यात नेतृत्वावरून संघर्ष?
3 वक्फ बोर्डच्या कारभारावर मंत्री मलिक असमाधानी
Just Now!
X