वर्चस्ववाद, श्रेष्ठतावादातूनच मोठय़ा प्रमाणावर हिंसा होत असून असुरक्षितता वाढत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येकाने अंधश्रद्धा निर्मूलनाची, विवेकाची आणि समतेची कास धरावी, मानवतेचा स्वीकार करावा असे आवाहन ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. भालचंद्र कानगो यांनी केले. मी म्हणतो तेच खरे आणि तुम्ही ऐकत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, अशी मानसिकता ही संविधान व मानवता विरोधी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बीड येथे शुक्रवारी अंनिस व महिला कला महाविद्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा संकल्प परिषद भालचंद्र कानगो यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अंनिसचे स्थानिक अध्यक्ष सुनील क्षीरसागर, प्रा. सविता शेटे, नामदेव चव्हाण, मधुकर जावळे, विजय घेवारे आदी उपस्थित होते. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर अंनिसने ‘िहसेला नकार मानवतेचा स्वीकार’ हे अभियान सुरू केले आहे. ‘मानवता आणि िहसा एकत्र चालूच शकत नाही. मी म्हणतो तेच खरे आणि तुम्ही जर ते ऐकत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही, मी तुमच्यावर हल्ला करील हा प्रकार वर्चस्ववादाचा आहे. ही मानसिकता संविधान, मानवता विरोधी आहे. या विचारांनी राष्ट्रनिर्मिती करण्याचा प्रयत्न एक विचारधारा करत आहे. मात्र त्या विचारधारेतून राष्ट्राचा, समाजाचा विकास होऊ शकत नाही, असे डॉ. कानगो म्हणाले.

विषमता, वर्चस्ववाद हा ज्या व्यवस्थेचा पाया राहिलेला आहे, त्या व्यवस्थेला धक्का देण्याचे काम दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी या विचारवंतांनी केले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन या विचारधारेतूनच आपण विवेकी समाजनिर्मिती करू शकतो हेच संविधानाने स्पष्ट केलेले आहे. आम्हाला सम्मान आणि समानता, समरसता आणि समता यात भेद करायला शिकावे लागेल. समता आणि समानता यातूनच मानवतेचा स्वीकार करणारा समाज निर्माण होऊ शकतो आणि हाच विचार, हाच संकल्प या परिषदेने करावा, असे आवाहन डॉ. कानगो यांनी केले.  शनिवारी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणाऱ्या निर्भय मॉìनग वॉकमध्ये तसेच दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत असलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.