एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस मागील पंधरा वर्षांपासून सत्तेत होती, तेव्हा कितीतरी वेळा धार्मिक आणि जातीय दंगली झाल्या. त्यामुळे अनेक निर्दोष मुस्लिम तरुणांना तुरुंगात डांबण्यात आले. मालेगाव, औरंगाबाद, पुणे येथील जर्मन बेकरी अशा कितीतरी प्रकरणात मुस्लिम तरूण निर्दोष असल्याचे सिध्द झाले आहे. त्यावेळी सत्ता शरद पवार यांचीच होती. तरीदेखील कारागृहात मुस्लिम आणि दलित तरूणच सर्वात जास्त संख्येने सडत होते. त्यामुळे मोदी आणि पवार हे एकच आहेत. त्यांच्यात काहीच फरक नाही, अशी टीका एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवेसी यांनी केली.

[jwplayer vtVpMCjf]

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ उस्मानाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी आले असता, माध्यमांशी ते बोलत होते. मागील पंधरा वर्षांत अल्पसंख्याकांसाठी केल्या जात असलेल्या आíथक तरतुदी सर्वकाही स्पष्ट करण्यास पुरेशा आहेत. दीड-दोनशे कोटी रुपये यापेक्षा अधिक निधीची तरतूद त्यांनी कधीच केली नाही. आज पवार काहीही बोलत असले तरी त्यांनी अल्पसंख्याकांसाठी कधीच योग्य काम केले नाही.

देशातील चलन १६ लाख कोटी रुपयांचे आहे. सुरुवातीला पंतप्रधान सांगत होते की, बनावट चलन मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र, तज्ज्ञांच्या अहवालातून केवळ चारशे कोटी रुपये बनावट असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण ०.२ टक्के एवढेही नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादी कारवायांना चाप मिळेल, असा दावा मोदी करीत होते. मात्र, तो फोल ठरला आहे. आसाम, काश्मीर या ठिकाणी सातत्याने दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. बँकांसमोर रांगा लागल्या आहेत. त्यात कुठेच विजय मल्ल्या, ललित मोदी दिसत नाहीत. समाधानकारक पावसानंतरही रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात नोटाबंदीच्या निर्णयामुळे रोकड नाही. रोख पसे जवळ बाळगणे हा गुन्हा आहे काय, असा सवालही ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला. इन्कम टॅक्स विभागाचे अहवाल आहेत, देशातील काळ्या संपत्तीत चलनाचा जो भाग आहे, तो केवळ सहा टक्के इतकाच आहे. हा सहा टक्के काळा पसा बाहेर काढण्यासाठी देशातील शंभर कोटी नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचेही सांगून ओवेसी पुढे म्हणाले, निवडणुका हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार असून तो दूर करावयाचा असेल तर निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे.

हा तर देशातील नागरिकांशीच ‘कोल्ड प्ले’ सुरू आहे

मुंबईत कोल्ड प्लेच्या नावाखाली सांस्कृतिक कार्यक्रमात मोदी सहभागी होत असले तरी नोटाबंदीच्या निर्णयाने देशात खऱ्या अर्थाने ‘कोल्ड प्ले’चा खेळ सुरू केला आहे. नागरिक थंडीत कुडकुडत बँकांबाहेर रांगा लावून बसले आहेत. हा कोल्ड प्ले देशातील नागरिकांसोबतच भाजपा सरकारने सुरू केला आहे. भाजपाचा हा कोल्ड प्ले कधीच सहन करणार नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ओवेसी यांनी निशाना साधला.

[jwplayer VwmkQGEJ]