औरंगाबाद : किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, मटण विक्रेते यांच्यासह व्यापाऱ्यांनी करोना नकारात्मक चाचणीचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे अनिवार्य केल्यानंतर औरंगाबाद शहरात चाचण्यांचा वाढता वेग शनिवारी मध्यरात्रीपर्यंत कायम होता. चाचण्यांसाठी शनिवारी लावलेल्या रांगांमुळे उडालेला गोंधळ  रविवारी कोठेही दिसून आला नाही. मात्र, चाचण्यांचा वेग कायम ठेवण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. प्रसाराचा वाढता वेग रोखायचा असेल तर चाचण्यांचा वेग वाढावायला हवा, हे सूत्र लागू पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी रविवारी करोना रुग्णांच्या संख्येत संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत ३९९ एवढी वाढ झाली. दरम्यान जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा आता ३९६ वर गेला असून सध्या चार हजार २३२ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान रविवारी सर्व वॉर्डांमध्ये चाचणी करुन घेण्यासाठी चांगला प्रतिसाद होता, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

औरंगाबाद शहरातील करोना प्रसार थांबविण्यासाठी शहराच्या सर्व बाजूने तसेच २३ ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आले. काही ठिकाणी प्रतिसाद  न मिळाल्याने अन्यत्र ते हलविण्यात आले. तर काही भागात दुपारनंतर चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लक्षणे नसणारे आणि सौम्य लक्षणे असणारी रुग्णसंख्या महापालिकेच्या कोविड उपचार केंद्रामध्ये दाखल होत असल्याने शहरातील बहुतांश भाग टाळेबंदी शिथिल केल्यानंतर काही दिवस सुरक्षित राहतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्येही मोठय़ा प्रमाणात चाचण्या केल्या जाणार आहेत. बहुतांश व्यवस्थापनाने या चाचणीसाठी लागणाऱ्या कीटचा खर्च उचण्यााचे मान्य केले आहे. उद्योगातील सर्व कामगार, अधिकारी यांच्या चाचण्या करुन घेतल्या जातील असे उद्योजक राम भोगले यांनी शनिवारी जाहीर केले होते. दरम्यान शहरातील विविध भागात चाचण्यांचा वेग वाढता राहिला.

दहा दिवसाच्या टाळेबंदीनंतर रविवारी भाजी बाजार पहाटेच सुरू झाला. मात्र, भाज्यांची आवक कमी होती. शहरातील बहुतांश भागात दुकाने उघडण्यात आली. रात्रीतून केलेल्या चाचण्यांचे अहवाल पुढे आल्याने व्यापाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.  दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असणाऱ्या सादात नगर येथील ३८ वर्षांच्या, गजानन नगर येथील ४२ वर्षांच्या पुरुषाचा, तर जटवाडा भागातील राधास्वामी भागातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात  करोनाबाधित ३०० जणांचा मृत्यू रविवारी झाला. दरम्यान १०९ जणांची स्थिती सामान्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जालन्यात करोनाचे ५४ बळी

आतापर्यंत जालना जिल्ह्य़ात करोनामुळे ५४ रुग्णांचा मृत्यूू झाला आहे. जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या १ हजार ३९९ झाली असून यापैकी ८२० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्य़ात संस्थात्मक अलगीकरणात ५३७ व्यक्ती आहेत. टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एक हजारांपेक्षा अधिक गुन्हे नोंदविण्यात आलेले असून १८४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, तर ८७६ वाहने जप्त केली आहेत.७ लाख ११ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

लातूरमध्ये ११५ करोनाबाधित

लातूर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपर्यंत आलेल्या अहवालात एकाच दिवशी तब्बल ११५ जणांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. शनिवारच्या अहवालात लातूर ६३ ,औसा ६,निलंगा ९,उदगीर ११, अहमदपूर ७ बाधितांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५२५ झाली असून सध्या ४८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी तीन जणांचा मृत्यू झाला. आता एकूण मृत व्यक्तींची संख्या ५० वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात करोनाची लागण झालेली आहे.

नांदेडमधील रुग्णसंख्या ९३५

नांदेडमध्ये आठ दिवसांत पावणेतीनशे रुग्णांची भर पडली असून  १९ रुग्ण दगावले. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ानंतर टाळेबंदीचे पर्व सुरू झाल्यावर पहिल्या दीड महिन्यांत जिल्ह्यातील करोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र १२  ते १८ जुलै या कालावधीत शहर आणि जिल्ह्यात तब्बल ३७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या दरम्यान १९ रुग्ण दगावले. जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या ४६ वर गेली. आरोग्य खात्याच्या यंत्रणेने शुक्रवारपासून इतर महानगरांच्या धर्तीवर अ‍ॅन्टिजेन जलद चाचण्या प्रणालीद्वारे  रुग्ण तपासणी सुरू केली आहे.त्यानंतरच्या २४ तासात शहर व जिल्ह्यात मिळून ९४ नव्या रुग्णांची नोंद झाली.