जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपशी घरोबा केलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश सोळंके यांनी लाऊन धरलीय. पक्षाविरोधात बंडाळी करणाऱ्या धस यांच्यावर कारवाई झाली नाही तर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा पुनरूच्चार सोळंके यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना केला.

बीड जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २५ जागा जिंकूनही सुरेश धस यांच्या बंडाळीमुळे सत्तेपासून राष्ट्रवादीला दूर रहावे लागले होते. त्यामुळे धस यांच्या विरोधात बीड राष्ट्रवादी मधून नाराजी व्यक्त केली गेली. नाराज नेत्यांमध्ये प्रकाश सोळंके आघाडीवर होते. माजलगाव विधानसभा मतदार संघातून प्रकाश सोळंके यांनी ९ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सोळंके यांच्या पत्नीच्या नावाची दावेदारी होती. मात्र शेवटच्या क्षणाला सुरेश धस हे पंकजा मुंडेंच्या गोटात दाखल झाल्यामुळे सोळंके यांना अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलं होते. त्यामुळे नाराज झालेल्या सोळंके यांनी धस यांच्यावर कारवाई झाली नाही तर पक्ष सोडण्याचा पवित्रा घेतला, त्याचा पुनरुच्चार सोळंके यांनी केला.
पक्ष सुरेश धस यांच्यावर कारवाई करेल. सध्या अधिवेशन सुरु असल्यामुळे पक्षाला आणखी काही वेळ देण्याची गरज असल्याचं सोळंके म्हणाले. मात्र येणाऱ्या काळात पक्षाने निर्णय घेतला नाही तर आपण वेगळा विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.