25 February 2021

News Flash

मी आता नदीजोड प्रकल्पाचा ‘माजी तज्ज्ञ’ – सुरेश प्रभू

साहजिकच नदीजोड प्रकल्पाविषयीचा प्रश्न पुढे आला. त्यावर प्रभू म्हणाले,

सुरेश प्रभू. (संग्रहित छायाचित्र)

एके काळी सुरेश प्रभूचे असे नाव उच्चारले तरी मराठी माणूस त्यांच्या पुढे ‘नदीजोड प्रकल्पाचे गाढे अभ्यासक’ अशी बिरुदावली लावत असे. त्यांचा या विषयातील तेवढा अभ्यास असल्याचे बडे नेतेही मान्य करतात. त्या अभ्यासाची शाबासकी म्हणूनच खास बोलावून घेऊन सुरेश प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. मात्र, आता ते स्वत:ला नदीजोड प्रकल्पाचा ‘माजी तज्ज्ञ’ असे संबोधून घेत आहेत. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या प्रकल्पाचे नक्की काय झाले, असे विचारले असता त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील दोन नद्या जोडणीच्या कामाची माहिती दिली. मात्र, जलसंवर्धन खात्याच्या केंद्रातील मंत्री उमा भारती यांना कोणताही सल्ला देणे चुकीचे ठरेल, असे ते म्हणाले.

रेल्वेमंत्री म्हणून केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत कोणती कामे केली, याची माहिती देण्यासाठी औरंगाबाद येथे शनिवारी सुरेश प्रभू यांच्या पत्रकार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये साहजिकच नदीजोड प्रकल्पाविषयीचा प्रश्न पुढे आला. त्यावर प्रभू म्हणाले, ‘हा विषय अगदी हृदयातील आहे. त्यावर कितीही वेळ बोलता येईल. हे सरकार आल्यापासून त्यात उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील केनबिटवा येथे काही काम सुरू झाले आहे. दमणगंगा-वापीचे काम अजून सुरू झाले नाही. नदीजोड प्रकल्प आवश्यकच आहे,’ असे ते म्हणाले. यावर केंद्रामध्ये या प्रकल्पासाठी प्रशाकीय नव्या संरचनेची गरज वाटत नाही काय, असा प्रश्न आला आणि प्रभू यांनी, ‘हा विषय केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या अखत्यारित येतो,’ असे उत्तर दिले. त्यावर, या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांना काही सल्ला द्याल काय, असे पत्रकारांनी म्हटले आणि प्रभू म्हणाले, ‘मी या विषयातील ‘माजी तज्ज्ञ’ आहे.’ त्यावर ‘तज्ज्ञ कधीच माजी नसतात’ असे पत्रकार म्हणताच, ‘उमा भारती यांना सल्ला देणे योग्य होणार नाही,’ असे म्हणत सुरेश प्रभू यांनी हसत हसत विषय टाळला.

मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वेमधून काढून तो मध्य रेल्वे विभागाशी जोडावा ही मागणी योग्य असल्याही त्यांनी मान्य केले. मात्र, एका विभागाचा दुसऱ्या विभागावर परिणाम होत असल्याने त्याबाबत विचार केला जाईल, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मराठवाडय़ात रेल्वेचा अनुशेष असल्याचे मान्य करत या भागासाठी स्वतंत्र एकात्म आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील रेल्वेस्थानक आदर्श बनविण्यासाठी केलेल्या प्रस्तावामध्ये पर्यटन विभागाकडून दिरंगाई होत असल्याची माहिती या वेळी अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 3:50 am

Web Title: now i am former expert of river connecting projects says suresh prabhu
Next Stories
1 शेतकरी आत्महत्येस केवळ ‘उत्पन्नातील घट’ कारणीभूत नाही!
2 मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या प्रमुख फातेमा झकेरीया यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा 
3 भाजपच्या ‘शिवार संवाद’ यात्रेचा मराठवाड्यात ‘खेळखंडोबा’ !
Just Now!
X