सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी

औरंगाबाद : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी औरंगाबादसह मराठवाडय़ात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. यामध्ये खासगी डॉक्टरही सहभागी झाले होते. देशभरात नेहमीच डॉक्टरांवर हल्ले होतात. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा तयार करावा, अशी जोरदार मागणी संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांनी सोमवारी केली. दरम्यान, डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम दिसून आला.

इंडियन मेडीकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने पुकारलेल्या संपात औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार ४०० डॉक्टर सहभागी झाले होते. तर १९ राज्यातील ७० हजार डॉक्टरांनी या संपात सहभाग घेतला असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी यांनी दिली. मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील सर्व खासगी रुग्णालये बंद राहणार असल्याचे डॉ. सोमाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आपत्कालीन रुग्णांना केवळ सुविधा दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्यात यावे, डॉक्टरांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांकडून करण्यात आल्या. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे, डॉ. कुलदिपसिंग राऊल आदींसह शहरातील खासगी डॉक्टर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लातूर जिल्हय़ातही डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला सर्वदूर पािठबा मिळाला. आयएमएचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. अजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत जिल्हय़ातील बाहय़रुग्ण विभाग बंद होता व अत्यावश्यक, आपत्कालीन सेवा सुरू ठेवल्या असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. हंसराज बाहेती, डॉ. मोहिनी गानू, डॉ. हमीद चौधरी, डॉ. अमीर शेख, डॉ. रमेश भराटे, डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. दीप गुगळे, आदी उपस्थित होते.

परभणी- परभणीतील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शहरातून रॅली काढून निषेध नोंदवला. या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. शहरातील खासगी डॉक्टर सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात जमले होते. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशनरोड, डॉक्टरलेन, नारायणचाळ माग्रे पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. डॉक्टरांना संरक्षण देणाऱ्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. परमेश्वर साळवे, सचिव डॉ. अमिताभ कडतन, डॉ. गोपाल जवादे, डॉ. भक्कड, डॉ.मीना परतानी, डॉ. विद्या चौधरी आदींची उपस्थिती होती.

उस्मानाबाद- देशव्यापी संपाला डॉक्टरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर बाह्य़रुग्ण विभागा बंद असल्याने या आंदोलनाची माहिती नसलेल्या रुग्णांची गैरसोय झाली. शासकीय रुग्णालयातही वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. देशव्यापी संपामुळे आजारी रुग्णांची हेळसांड  झाली. आयएमएच्यावतीने सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वैद्यकीय सुविधा बंद ठेवून हल्लेखोरांवर कारवाई करावी तसेच अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याबाबत काटेकोर उपाययोजना करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व त्या-त्या तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले. उमरगा येथील आयएमए शाखेच्या अध्यक्षा डॉ. दीपा मोरे, उपाध्यक्ष डॉ. दत्ता खलंगरे, खजिनदार डॉ. अनंत मुगळे यांनी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी कडक कायदा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केले.