सुहास सरदेशमुख

राज्यातील साधारणत: दोन ते अडीच हजार वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बाधित किंवा विलगीकरणात आहेत. रुग्ण आणि हजारो विलगीकरण कक्षातील व्यक्तींना जेवण पोहोचविणे हेही जबाबदारीचे काम.  त्यावर उपाय म्हणून यंत्रमानवाकडून (रोबो) च्या माध्यमातून ही कामे करण्याचा प्रयोग औरंगाबादमध्ये सुरू करण्यात आला आहे. शहरातील यंत्रमानव निर्मितीच्या क्षेत्रातील तरुण उद्योजक रोहित दाशरथी यांनी विलगीकरण कक्षातील जेवण पुरविण्यासाठी एक रोबो महापालिकेकडे दिला आहे. एमजीएम येथील विलगीकरण केंद्रात त्याचा उपयोग सुरू आहे. तर जिल्हा रुग्णालयात या प्रयोगाची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सफाई करण्यासाठी दोन्ही बाजूला फवारणी करता येईल अशी यंत्रणाही बसविल्याने त्याचा अधिक फायदा होत होईल, असा दावा केला जात आहे.‘ रुचा यंत्रा’ या कंपनीमार्फत केला जाणारा हा प्रयोग सध्या आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा धोका कमी करण्यात महत्त्वपूर्ण आहे.

एका रोबोला पाठीमागच्या बाजूने आता निर्जंतुकीकरणासाठी फवारणी यंत्रणाही बसविण्यात आली. २५ लिटरचे सोडियम हायपोक्लोराइडचे मिश्रण वाहून नेण्याची क्षमता आहे. औषध फवारणी करताना किती दाब असावा, किती औषध सोडले जावे, याचे नियंत्रणही मोबाइलवरून करता येते. तर दुसऱ्या रोबोमध्ये तयार जेवणाची पाकिटे आणि औषध गोळ्या ठेवण्याचे ताट अशी त्याची रचना आहे. हे दोन्ही रोबो मोबाइलद्वारे संचलित करता येतात. त्यामुळे करोना वॉर्डातील संपर्क कमी होईल आणि  वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा धोका कमी होईल, असे  दाशरथी सांगतात.

अशी आहे ‘राघव’ या यंत्रमानवाची रचना

* लांबी- १०८०, रुंदी ६२५, ७८० उंची मिलिमीटर

* हाताळणी मोबाइलद्वारे

* वळण घेण्याची क्षमता १.५ मीटर

* वजन वाहून नेण्याची क्षमता २५० किलो

* बॅटरीला चार्ज करण्यासाठी लागणारा वेळ तीन तास

* साधारणत: याच पद्धतीची रचना असणारा ‘वामन’ नावाचा रोबोही आहे. मात्र, त्याचा आकार आणखी लहान आहे.