औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे ५२४ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार शहनवाझ खान यांना पाच मते मिळाली. १३ मते अवैध ठरली. एमआयएम आणि काँग्रेसच्या मतांमध्ये या निवडणुकीत मोठी फूट पडल्याचे दिसून आले. एमआयएमच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेला मतदान केले असल्याचे स्पष्ट होत आहे. दानवे यांचा हा विजय शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

या निवडणुकीसाठी ६५७ मतदार होते. त्यापैकी ६४७ मतदारांनी मतदान केले. औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्य़ात स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना आणि भाजपच्या वरचष्मा होता. महायुतीकडे ३३३ मतदार होते, तर काँग्रेसकडे २५१ मतदार असल्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात काँग्रेसच्या अनेक नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेला मतदान केले असल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या प्रक्रियेत काँग्रेसमधून राजीनामा देऊन बाहेर पडलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत उत्तम कामगिरी करणारा कार्यकर्ता अशी अंबादास दानवे यांची ओळख आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांना स्थान दिले जावे, अशी मागणी कार्यकर्ते करत होते.

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर ती संपेपर्यंत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांचीच आघाडी होती. कुलकर्णी यांना काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केले नाही, हे स्पष्ट झाले.