औरंगाबाद : बारावीच्या इंग्रजी विषयाला येथील छावणी परिसरातील एका मुलाला चक्क उत्तरपत्रिकाच शिक्षकांच्या मदतीने सोडवून देत असल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास वाळूज परिसरातील शेणपुंजी येथील गजानन ज्युनिअर महाविद्यालयात उघडकीस आला आहे.  याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका केंद्र प्रमुखासह चार शिक्षकांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रप्रमुख रत्नमाला कदम, शिक्षक शरणाप्पा साधु रक्षाळकर, कल्याण रघुनाथ कुळकर्णी, ललेश हिलाल महाजन, अक्षय प्रकाश आरके यांच्याविरुद्ध उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

गजानन महाविद्यालयात एका गैरहजर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका घेऊन त्यावर प्रश्नपत्रिकेवरील उत्तरे शिक्षकांच्या मदतीने लिहून देण्यात येत असल्याचे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी धनवटे व विशेष पोलीस अधिकारी संजय निमोने यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलीस निरीक्षक सावंत, शिक्षणाधिकारी (मा.) बी. बी. चव्हाण यांना माहिती दिली. या प्रकरणाची पडताळणी पोलीस उपनिरीक्षक प्रिया फड यांनी रांजणगाव ग्रामपंचायतीच्या दोन कर्मचाऱ्यांना पंच म्हणून नियुक्त करून केली. या नंतर शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांना घटनास्थळी पाठवून माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. दरम्यान विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण येऊ नये यासाठी काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना ओवाळण्यात आले.

पहिल्याच दिवशी  ८२ गैरप्रकारांची नोंद

राज्य मंडळाकडून परीक्षेत गैरप्रकार न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आलेले असूनही राज्यभरात पहिल्याच दिवशी ८२ गैरप्रकारांची नोंद झाली. नऊ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक ३४ गैरप्रकार लातूर विभागीय मंडळात नोंदवले गेले आहेत. त्या खालोखाल नाशिक विभागीय मंडळात १८ गैरप्रकार झाले.