11 December 2017

News Flash

मुनगंटीवारांना गोपीनाथ मुंडे स्मारकाचा विसर

विविध स्मारकांसाठी २०० कोटींचा निधी

खास प्रतिनिधी, औरंगाबाद | Updated: March 20, 2017 1:02 AM

सुधीर मुनगंटीवार

विविध स्मारकांसाठी २०० कोटींचा निधी

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर ऊसतोड मजुरांसाठी घोषित केलेल्या महामंडळासही निधी देण्यात आलेला नाही. दोन वर्षांपासून या दोन्ही घोषणा करण्यात आल्या होत्या. स्मारकासाठी तर दूध डेअरीजवळील जागाही निश्चित करण्यात आली, मात्र त्यास निधी दिला गेला नाही. विशेष म्हणजे राज्यातील इतर सर्व स्मारकांसाठी तब्बल २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे यांचे नाव असणाऱ्या एकाही संस्थेला आर्थिक तरतूद न करता जुन्या राजकारणाचे उट्टे काढले जात असल्याचा सूर मराठवाडय़ातून उमटू लागला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना मुनगंटीवार यांना हटवण्यासाठी गोपीनाथराव अग्रेसर होते. त्यामुळेच त्यांच्या नावाला पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचे सांगितले जात आहे.

या दोन्ही घोषणा गेल्या वर्षी करण्यात आल्या होत्या. त्या पूर्ण करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. या दोन्ही घोषणांसाठी निधी मिळाला आहे की नाही, याची खातरजमा वित्तमंत्र्यांशी केली. त्यांनी स्मारकासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितल्याचे बोराळकर म्हणाले. निधी न देताच या दोन्ही घोषणा अंमलबजावणीमध्ये कशा येणार या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नसल्याने गोपीनाथरावांचे नाव वगळून असा एककलमी कार्यक्रम भाजपचे वरिष्ठ नेते अवलंबत असल्याची चर्चा सुरू आहे. स्मारकाच्या मागणीचा तसा पाठपुरावाही मराठवाडय़ातील आमदारांनी केला नाही.

गोपीनाथरावांचे नाव घेऊन काही मागणी केल्यास वरिष्ठांना ते आवडेल की नाही, अशी शंका अनेक आमदारांच्या मनात आहे. कार्यकर्तेही उगीच आपण कशाला यात पडा, या भूमिकेत असल्याने स्मारक आणि ऊसतोडणी महामंडळ या दोन्ही घोषणांसाठी निधी मिळू शकलेला नाही. राज्याच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विविध स्मारकांसाठी निधीची घोषणा आहे, मात्र त्यातून नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले आहे.

स्मारकाच्या निधीबाबतची माहिती घेण्यासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्या परदेशी असल्याचे सांगण्यात आले. बजेट बुकमध्ये पाहिल्याशिवाय या दोन्ही घोषणांच्या अनुषंगाने निधी देण्यात आला आहे किंवा कसे हे सांगता येणार नाही, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

First Published on March 20, 2017 1:02 am

Web Title: sudhir mungantiwar gopinath munde