६५ वर्षीय महिलेचा मृत्यू, २५ रुग्णांवर उपचार सुरू; एका रुग्णाची वाढ

शहरातील बिसमिल्लाह कॉलनीतील ६५ वर्षीय करोनाबाधित महिलेचा आज सकाळी पावणे सातच्या सुमारास मृत्यू झाला. या महिलेस न्यूमोनिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता. एका खासगी रुग्णालयातून या महिलेस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आणण्यात आले होते. या मृत्यूमुळे औरंगाबाद शहरातील करोना बळींचा आकडा तीन झाला आहे. दरम्यान बायजीपुरा या भागातील १५ वर्षांच्या मुलाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील रुग्णांचा आकडा २९ वर गेला आहे.

मुंबईच्या जोगेश्वरी भागातून औरंगाबाद येथे रुग्णवाहिकेतून आलेल्या गर्भवती महिलेसही करोनाची लागण झाली होती. तिच्या दुसऱ्या मुलासही करोनाची बाधा झाल्याचे लक्षात आले आहे. दरम्यान बायजीपुरा भागात एवढे दिवस या कुटुंबांच्या संपर्कात नसल्याचा दावा  करणारे काही जण तपासणीसाठी पुढे येऊ लागल्याचे या भागात काम करणाऱ्या ‘आशा’ कार्यकर्तीने सांगितले.

दरम्यान शहरातील १३ भाग पूर्णत: बंद करण्यात आले असले तरी लोक गल्ली सीमा ओलांडत नाहीत पण गल्लीमध्ये मात्र त्यांचा वावर अधिक आहे. ती चिंता वाढविणारी गोष्ट असल्याने पोलिसांना या भागात गस्त वाढवायला सांगण्यात येत आहे.

औद्योगिक वसाहत बंदच

टाळेबंदीमध्ये २० एप्रिलनंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ज्या कंपन्या नियम पाळतील, त्यांना कारखाना सुरू करण्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र, शहराच्या हद्दीतील कारखाने सुरू करता येणार नाहीत. चिकलठाणा आणि  रेल्वे स्टेशन या औद्यागिक वसाहती बंद राहतील तर शेंद्रा आणि वाळूज औद्योगिक वसाहतींमध्ये कामागारांची योग्य ती काळजी घेऊन काम सुरू होऊ शकते. किती कंपन्या सुरू होतील हे मात्र औद्योगिक महामंडळाच्या पोर्टलवर केलेल्या किती अर्जाना परवानगी मिळू शकेल, यावर अवलंबून असणार आहे.

उस्मानाबाद करोनामुक्तीकडे

उमरगा येथे पानिपत येथून आलेले दोघे जण आणि ताज हॉटेलमध्ये काम करणारा एकजण अशा तिघांना करोनाची बाधा झाली होती. या तिघांच्या करोना चाचणीचे पहिले अहवाल नकारात्मक आले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद व उमरगा येथील आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला.