प्राणवायूची गरज आणि उपलब्धता याची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद येथील दोन उत्पादक कंपन्यांवर दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून येत्या काळात करोना रुग्णांची वाढ होईल, असे गृहीत धरून ऑक्सिजनचे मागणी पत्र तयार केले जात आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आहेत त्यांनी आधी तेथील गरज पुरवावी असे सांगण्यात आले असल्याने प्राणवायूवर देखरेख ठेवणारी यंत्रणा आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्रपणे उभी करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्य़ातील चाकण आणि औरंगाबाद येथील दोन्ही कंपन्यांनी आता रुग्णालयांना प्राधान्याने पुरवठा करण्याचे आदेश बजावले आहेत. मात्र, पूर्वी दररोज येणारे द्रवरूप ऑक्सिजन तातडीने मिळत नाही. त्याला कधी-कधी चार दिवसांपर्यंतचा उशीर लागत असल्याने मागणी नोंदविण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यांमध्ये अस्तित्वात असणारे करोना रुग्ण आणि ऑक्सिजन लागणारे रुग्ण याचा अंदाज घेऊन मागणी नोंदविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्राणवायूची वाहतूक आणि पुरवठा या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात दोन ऑक्सिजन निर्मिती करणारे व वितरण करणाऱ्या कंपन्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत असल्याचे औषधी विभागाचे सहसंचालक संजय काळे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले होते.  उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यास पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधून पुरवठा होतो. आयनॉक्स या कंपनीकडे सध्या होणारी मागणी लक्षात घेता आपल्या जिल्ह्याचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी खासे प्रयत्न केले जात आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनीही प्राणवायू निर्माण व वितरण कंपन्यांच्या उत्पादनावर आणि वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अधिकारी नेमण्याच्या सूचना विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. उत्पादित होणाऱ्या एकूण ऑक्सिजनपकी ८० टक्के ऑक्सिजन रुग्णालय प्राधान्यासाठी असेल आणि उर्वरित २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी असेल असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान ऑक्सिजनची कमतरता होणार नाही याची काळजी घेणारी यंत्रणा जिल्हास्तरावर उभारण्यात येत असून गंभीर रुग्ण असणाऱ्या रुग्णालयांना द्रव स्वरूपात आणि ज्या जिल्ह्यांमध्ये टँक निर्मितीचे काम सुरू आहे अशा जिल्ह्य़ांत सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरून देणारी व वाहतुकीची व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान ऑक्सिजन सुविधेसह खाटांची संख्या वाढविण्याचेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, प्राणवायू पुरविण्यात ‘स्थानिक प्राधान्य’ अशी भूमिका पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यांनी घेतली आहे. या जिल्ह्यातील रुग्णसंख्याही अधिक आहे. मात्र, पुरवठा सुरळीत राहील यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.