एकवटलेल्या शक्तीचा उपयोग जलशक्ती अभियानात

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

पैशांची बचत करून कुटुंबस्तरावर आर्थिक स्थिरता येण्यासाठी बचतगट चळवळीखाली एकवटलेल्या शक्तीचा उपयोग आता पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्षलागवड आदी शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी करण्यात येणार आहे. जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून बचतगटाचे सदस्य आता नैसर्गिक साधनसामग्रीच्या साठय़ांची बचत करण्याचा संदेश देताना दिसणार आहेत.

राज्यात १५ सप्टेंबपर्यंत जलशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत या संदर्भातील जन आंदोलन उभारण्यात येत असून त्या माध्यमातून या अभियानांतर्गत पाणीबचतीच्या योजनांची माहिती देण्याचे उपक्रम शहर, महानगरपातळीवर राबवण्यात येणार आहेत. विविध योजनांमधील पाणी बचतीसाठीचे संदेश बचत गटांचे सदस्य, वस्तीस्तरीय संघाचे सदस्य जनजागृतीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत.

या अनुषंगाने १ ऑगस्ट रोजी विविध विभागांच्या साहाय्याने प्रभातफेरी काढून पाणीबचतीचे संदेश देण्यात यावेत. त्यात प्रामुख्याने पावसाचे छतावरील वाहून जाणारे पाणी मुरवणे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षलागवड करणे, आदी संदेशांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बचतगटांच्या सदस्यांचा सहभागा घ्यावा, अशा सूचना नगर परिषद संचालनालयाने नगरपालिका, महानगरपालिकांच्या शहर प्रकल्प अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

’ राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील बचतगटांशी जोडलेल्या महिलांची संख्या तब्बल १५ लाख दोन हजार ५११ एवढी आहे. तर आर्थिक विकास मंडळाकडून १ लाख २६ हजार ९३९ बचतगट बांधले गेले आहेत. त्यातील बहुतांश बचतगट ग्रामीण भागात असले, तरी शहरी भागातील बचतगटाशी जोडले गेलेल्या महिला व पुरुषांच्या सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. या एकत्रित शक्तीचा उपयोग पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी करण्याचा निर्णय प्रशासनाच्या स्तरावरून झाला आहे.