आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अर्धागिनींच्या वाटय़ासाठी महिला आयोगाचा पुढाकार

मराठवाडय़ात २०१६ मध्ये १ हजार २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात वाढ होत राहिली. ऑगस्ट २०१७ पर्यंत त्यात ५८० आत्महत्यांची भर पडली. आकडा वाढतोच आहे. दररोज एका बाईच्या कपाळावरचे कुंकू पुसले जाते. वैधव्य आलेल्या, पतीच्या निधनानंतर निराश झालेल्या या महिलांना आधाराची गरज असते. कारण या बहुतेक जणींना नवऱ्याच्या संपत्तीतून बेदखल करण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे सुरू आहे. सासू-सासऱ्यांची नावे जमिनीच्या सातबाऱ्याला लागली. अनेक जणींनी ‘आमचा वाटा कुठे आहे हो’ असा प्रश्नही करून पाहिला. पण हाती काही लागले नाही. आता या प्रश्नी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे. मराठवाडा आणि विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना त्यांचा वैधानिक हक्क दिला जावा, अशी सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केली आहे.

ग्रामीण भागात अशा पद्धतीची मानसिकता घडविण्यासाठी शिबिरे घेतली जावीत, असेही महिला आयोगाने सुचविले असून विविध सरकारी योजनांचे लाभार्थी म्हणून या महिलांचा विचार केला जावा, असे कळविण्यात आले आहे. लातूर जिल्ह्य़ातील देवणी तालुक्यातील वलांडीच्या संगीता भगवान सूर्यवंशी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी वलांडीच्या साडेचार एकरात भगवान सूर्यवंशी यांनी सोयाबीन पेरले होते. गारपीट झाली आणि सारे पीक वाया गेले. घरात सासू-सासरे, दोन दीर असा परिवार. चार मुले झाली संगीताबाईंना. पहिली मुलगी हाताने अपंग आहे. दुसरी दहावीची परीक्षा देत आहे. तिसरा त्रिनेत्र नववीत आहे आणि चौथी पूनम सातवीमध्ये शिकते. जमीन कसणारा नवरा गेला, प्रश्न निर्माण झाला. जमीन कोणाच्या नावाने करायची? संगीताबाईंचे सासू-सासरे म्हणाले, जमीन आमची आहे. सासरा शेषराव आणि सासू लक्ष्मीबाई यांनी आपापल्या नावे साडेचार एकर जमिनीची समसमान वाटणी करून घेतली. संगीताबाईंना आता प्रश्न आहे, तीन मुलींचे लग्न करायचे कसे? शंभर रुपयांवर रोजंदारीने जाणाऱ्या संगीताबाई म्हणतात, सासू माझ्या नावावर काहीएक द्यायला तयार नाही. नवरा गेला आणि घरापासूनही जरा दूरच ठेवले गेले. जमिनीचा एखादा तुकडा मिळाला तर कसून खाता येईल.

निलंगा तालुक्यातील शिऊर गावच्या मंदोदरी राजकुमार बंडगर यांची अवस्थाही अशीच. तीन एकर शेतीत सोयाबीन लावले होते. चार विंधनविहिरी घेतल्या. एकालाही पाणी नाही लागले. एका विंधनविहिरीत पाणी होते म्हणून मोटार टाकली. ती अडकून बसली. ती काढण्यासाठी नव्याने पैसा लागणार होता. तोपर्यंत कर्ज झाले होते. दीड लाख रुपये सावकाराकडून घेतले होते. तेव्हा घरात बैलबारदाना होता. नवरा गेला आणि गाय आणि बैल विकले. त्यातून आलेल्या पैशांतून नवऱ्याने केलेली उधारउसनवारी फेडली. तीन एकरापैकी दीड एकर शेत मंदोदरीबाईंच्या नावाने करण्यात आले. त्यांना तीन मुले. पाचवीत शिकणारी रुक्मिणी, तिसरीतला दिगंबर आणि सात वर्षांचा होऊनही न चालता येणारा विशाल. नवरा गेला तेव्हा बँकेचे पैसेही भरले. तेव्हा हातउसने १० हजार घेतले होते. कर्ज १७ हजार मिळाले. ज्याच्याकडून १० हजार रुपये घेतले होते, ते त्याला परत केले आणि सात हजार रुपयांतून उरलेली उधारी फेडली. त्याही १०० रुपयांच्या मजुरीवर. दुसऱ्याच्या शेतात राबतात, तेव्हा त्यांचे शेत पडीक पडलेले असते. स्वत:च्या शेतात जावे तर मजुरी मिळत नाही. परिणामी करावे तरी काय आणि जगावे तरी कसे, असा प्रश्न घेऊन त्या सोमवारी औरंगाबादला आल्या होत्या. महिला आयोगाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांनी त्यांची व्यथा सांगितली. अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आता महिला आयोग पुढाकार घेईल, असे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.

पुन्हा सर्वेक्षण..

उस्मानाबाद, नांदेड, परभणी या जिल्ह्य़ातून आलेल्या १००हून अधिक महिलांनी त्यांची व्यथा सांगितली. ती संपत्तीतल्या वाटय़ाची होती. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या अर्धागिनीना जमिनीत वाटा मिळविण्यासाठी एक वेगळा संघर्ष करावा लागतो आहे. अशा वारसानोंदी महसूल विभागाने तातडीने कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनीही पुन्हा एकदा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे ४ एप्रिल रोजी पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे सांगितले.