औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रासह परिसरातील पर्यटनस्थळांच्याही विकासाला चालना देण्यासाठी मजबूत रस्ते व इतर आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी १ हजार कोटी रुपये दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. नागपूर-मुंबई या महामार्गामुळे खऱ्या अर्थाने मराठवाडा समृद्ध होईल. या समृद्धी मार्गालगत गॅस व पेट्रो केमिकलची पाइपलाइन टाकण्याचा विचार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालय विचार करीत असल्याची माहिती देऊन या भागाला पोर्ट कनेक्टिव्हिटीची जोड मिळाल्यास मराठवाडा २० वर्षे पुढे जाईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील कलाग्राममध्ये गुरुवारी ‘मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अँड अॅग्रिकल्चर’ (मसिआ) आणि ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ यांच्यातर्फे आयोजित ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०१७’च्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी तब्बल दोन तास उशिराने कार्यक्रम स्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्र्यांनी आटोपशीर भाषण केले. त्यात त्यांनी मराठवाडा व विदर्भ यांच्या विकासासाठी दोन्ही विभागातील नेत्यांनी विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र येण्याची गरज व्यक्त करून राज्यात परदेशी गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी निम्मी म्हणजे ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले. भूम येथे खवा क्लस्टर, नांदेड येथे प्रिंटिंग व औरंगाबादेत रबर क्लस्टर तयार होणार आहे. पैठण येथे मेगा गुड्सपार्क येत आहे. त्यासाठी ३५० कोटींची गुंतवणूक असून या प्रकल्पातून पंधराशे जणांना रोजगार मिळणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
मंत्र्यांची परस्परांची स्तुती
मुख्यमंत्र्यांनी नुकतेच शिवसेनेच्या पालकमंत्र्यांची खांदेपालट केला आहे. त्यावरून शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडल्याची घटना ताजी असतानाच मुख्यमंत्री व शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी आजच्या कार्यक्रमात परस्परांची जाहीरपणे स्तुती केली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना देसाई म्हणाले, महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत मुख्यमंत्र्यांसोबत सहभाग घेण्याचे सद्भाग्य मला लाभले. उद्योगस्नेही वातावरण करण्यात फडणवीस सरकारला यश आले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ऑनलाईन प्रणाली आणून उद्योगमंत्रालयाच्या कारभारात पारदर्शकता आणल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांचे जाहीर अभिनंदन केले.
यांची कार्यक्रमाकडे पाठ
औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर हे सन्माननीय अतिथी असतानाही त्यांची अनुपस्थिती सर्वाच्या नजरेत भरणारी होती.