छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणामध्ये तरंगत्या सौर पटलाच्या आधारे १३४२ मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पास केंद्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता दिली आहे. पक्षी अभयारण्य आणि पर्यावरणावर या प्रकल्पाचा कोणताही विपरित परिणाम होणार नसल्याने वीज खरेदीचे करार केले जातील आणि त्यानंतर दीड ते दोन वर्षांत हा वीज प्रकल्प सुरू होईल, असा दावा खासदार डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केला. देशातील हा सर्वांत मोठा प्रकल्प असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या प्रकल्पास मच्छिमार संघटनेने विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचे मत फेटाळले असून, पर्यावरण क्षेत्रातील अभ्यासकांनीही या प्रकल्पास अनुमती दिली असल्याचा दावा डॉ. कराड यांनी केला. जायकवाडी धरणातील ४२५२. ९५ हेक्टरावर तरंगते सौरपटल टाकले जाणार असून, एकूण क्षेत्राच्या १२ टक्क्यांवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या वतीने या प्रकल्पाची परवानगी मागण्यात आली होती.

केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने या प्रकल्पासाठी दीपक नायक यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. खासदार कराड म्हणाले की, हा प्रकल्प व्हावा म्हणून खूप दिवसांपासून पाठपुरावा करत होतो. आता वीज खरेदीचे करार केल्यानंतर एनटीपीसी तर्फे हा प्रकल्प उभा राहण्याचा मार्ग मोकळा होईल. वीज खरेदीच्या कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मित्रचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकर मार्गी लागेल, असे ते म्हणाले.