छत्रपती संभाजीनगर – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुका हा मगरघाट क्षेत्र ठरतोय का, असा प्रश्न निर्माण झाला असून, मागील पाच वर्षांमध्ये परिसरातील २० किलोमीटरच्या परिघात आतापर्यंत दहापेक्षा अधिक महाकाय मगरी आढळून आल्या आहेत. मागील आठवड्यात केंद्रेवाडीत महाकाय मगर आढळून आली होती. तर तत्पूर्वी दोन महिन्यांपूर्वी ढाळेगाव येथेही एक मगर दिसून आली होती.

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे आठ फूट नऊ इंचाची आणि तब्बल १७० किलो वजनाची महाकाय मगर आढळून आली. केंद्रेवाडीजवळ डाळेगाव तलाव असून, त्यातून ही मगर केंद्रेवाडीजवळ आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रेवाडीजवळील महादेव मंदिराजवळ विष्णूकांता मुरलीधर केंद्रे या ६० वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीला शेतापासून काही अंतरावर एक अजब हालचाल आढळून आली.

नेहमीपेक्षा विचित्र हालचाल करणारा प्राणी असल्याचे केंद्रे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेले दयानंद केंद्रे यांच्या निदर्शनास घडणारा प्रकार आणून दिला. दयानंद यांनी थोड्या अंतरावर जाऊन अंदाज घेतला. मगर असल्याची खात्री पटताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. तसेच उदगीर येथील सर्पमित्र तथा यापूर्वीही परिसरात आढळलेल्या सहा मगरींना पकडलेले सिद्धार्थ काळे यांना पाचारण करण्यात आले. वनअधिकारी वर्षा घुगे यांचे पथक व सिद्धार्थ काळे यांनी महाकाय मगरीला जेरबंद केले.

यासंदर्भात सिद्धार्थ काळे यांनी सांगितले की, केंद्रेवाडीजवळ आढळून आलेल्या मगरीच्या पोटाचा घेर पोट ते पाठ मिळून चार फुटांचा असून, तिला पकडण्यासाठी चार तासांपेक्षाही अधिकचा वेळ लागला. अहमदपूरजवळ केंद्रेवाडीतच मगर आढळली असे नाही तर यापूर्वीही परिसरातील घोटका (ता. कंधार), सावरगाव, भाकरवाडी, ब्रह्मवाडी येथेही महाकाय मगरी आढळल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात पाच ते सात वर्षापूर्वी मोठा पाऊस झाला होता. तेव्हापासून अहमदपूर तालुक्यात अधिक मगरींचे दर्शन होत असल्याचे सांगण्यात आले. अहमदपूर परिसरात लिंबोटी धरण असून, या धरणाला मन्यार नदीतून पाणी येते. मन्यारमध्ये गोदावरी नदीतून पाणी येते. अहमदपूर तालुक्यातील सावरगाव येथे पहिली मगर थोट सावरगावला मिळाली होती.

२०२० सालच्या करोना काळातील ही घटना आहे. याशिवायही तालुक्यातील पाझर तलावातही मगरी आढळून आल्या होत्या. शिरूर ताजबंदलाही करोना काळात आढळून आली होती. भाकरवाडीला सापडली होती तेव्हाही आणखी तीन मगरी तेथे होत्या, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घोटक्याच्या अलिकडे मोजा गावातही एक दोन क्विंटलच्या वजनाची एक मगर आढळून आली होती. कदाचित तीच मगर घोटक्याची असावी, असा अंदाज आहे, असे सिद्धार्थ काळे यांनी सांगितले.

कुठे कधी आढळल्या मगरी

  • ▶️ सावरगावात ३ जून २०२० रोजी धरण क्षेत्रातील ३० फूट खोल विहिरीत १२० किलो वजनाची मगर आढळली. तिला बाहेर काढण्यासाठी ५ तासांचा व वेळ लागला.
  • ▶️ भाकरवाडीत पाझर तलावाशेजारच्या नदी ओढ्यात १४ जून २०२३ रोजी पकडली १५० किलो वजनाची ८ फूट लांब मगर मिळून आली.
  • ▶️ ब्रम्हवाडीत ३ मार्च २०२४ रोजी १५० वजनाची व आठ फूट लांबीची मगर मिळाली. अहमदपूरपासून जवळ असलेल्या घोटका (ता. कंधार, जि नांदेड) येथे ११ फेब्रुवारी २०२५ रोजी ८ फूट ७ इंच लांबीची मगर दिसून आली. पकडण्यासाठी मध्यरात्री साडेतीन तास लागले.
  • ▶️ ढाळेगाव (ता अहमदपूर) येथे १८ ऑगस्ट २०२५ रोजी १५० किलो वजनाची ८ फूट लांबीची मगर आढळली.
  • ▶️ केंद्रेवाडी (ता. अहमदपूर) ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी शेतातील कालव्यामध्ये दिसून आलेल्या मगरीचे वजन १७० किलो तर लांबी ८ फुट ९ इंच होती.

कसा असतो मगरीचा प्रवास

मादी मगर जेव्हा अंडी देण्यापूर्वी नर साथीदारापासून दूर जाते. अंडी नर मगर खाण्याची तिला भीती असते. त्यामुळे दूर जाऊन जाते. प्रवासातूनच मगरी अहमदपूर भागात आल्या असण्याची शक्यता आहे. जमिनीवरचा प्रवास हा रात्रीतून आणि डोंगर भागातून करते. वातावरण थंड असते. निशाचर असल्याने रात्रीचे तिला दिसते. घोटक्याची मगर ही माळरानावरच सापडली होती. जमिनीवरची मगर चपळ नसते.

मगर पकडण्यासाठी काय क्लृप्ति

मगर पकडण्यासाठी तोंड बंद ठेवण्यासाठी चिकटपट्टी, नायलोनची दोरी, पाय बांधण्यासाठी स्वतंत्र दोरी, डोळयांवर झाकण्यासाठी कपडा आणि तोंडाला फासा घालण्यासाठी एक चिमटा असतो, असे सिद्धार्थ काळे यांनी सांगितले.