छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षापूर्वी मराठवाडा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करता सरकारने त्याचे या प्रदेशावरचे प्रेम पुतणा मावशीसारखे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. या बैठकीत १०० घोषणा आणि २० निर्णय घेण्यात आले होते तब्बल ३७ हजार १६ कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या घोषणा हवेत विरल्याचा आरोप दानवे यांनी केला.

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पश्चिम नद्यांचे पाणी आणण्यासाठी १४ हजार ४० कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली होती. दोन वर्षात सिंचन प्रकल्पासाठी फक्त एक हजार १८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या गतीने असे प्रकल्प पुढील २० वर्षेही पूर्ण होणार नाहीत, असे दानवे म्हणाले. याच बैठकीत रस्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागास १२ हजार ९३ कोटी रुपयांचा निधी देऊ असे शासनाने म्हटले होते. आतापर्यंत केवळ ३०४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हायब्रीड अन्युटीचे धोरण बदलल्याने आता हे रस्ते पूर्ण होणार की नाही , या विषयी शंका असल्याचे दानवे म्हणाले. क्रीडा विद्यापीठ, दुधाळ जनावरांचे वाटप असे अनेक प्रकल्प जणू रद्दच झाले आहेत. हे सरकार फक्त ‘ मला पहा आणि फुलं वहा ’ या मानसिकतेत असल्याची खरमरीत टीका केली.

सध्या सरकारचा कारभार भगवान भरोसे सुरू असून गेल्या काही दिवसात सरकारने ७६ हजार ४८४ कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. एका बाजूला राज्य सरकारकडे पैसेच नाहीत आणि दुसरीकडे सर्व सामांन्यांच्या पैशाची लूट सुरू असल्याचेही ते म्हणाले. काहीही न करता जाहिराती देण्यात हे सरकार आणि मुख्यमंत्री गर्क असल्याचा आरोही त्यांनी केला.

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा भाषण करतील तेव्हा त्यांनी नव्या घोषणा न करता पूर्वी जाहीर केलेल्या मंत्रिमंडळातील घोषणांच्या निधीची तजवीज करावी. केवळ दुष्काळमुक्त करू असे म्हणून भागणार नाही. गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी हैराण आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावेत. खरे हे मुद्दे आंदोलन करायला भाग पाडणारेच आहेत पण मराठवाडा मुक्ती दिनी आंदोलन करण्याची शिवसेनेची मानसिकता नाही, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.