औरंगाबाद : यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ‘लोकसत्ता’चे संपादक तसेच राजकीय आणि अर्थविषयक घडामोडींचे जाणते अभ्यासक-विश्लेषक गिरीश कुबेर यांना जाहीर झाला आहे. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असून १३ नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे, असे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. सविता पानट यांनी सागितले.

‘मराठवाडा’ वृत्तपत्राचे संपादकपद दीर्घकाळ भूषविणाऱ्या अनंत भालेराव यांचे १९९१ मध्ये निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला महाराष्ट्रभर मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अनंतरावांनी ज्या हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रामात कृतिशील योगदान दिले, त्या संग्रामाच्या अमृतमहोत्सवी पर्वातील यंदाचा हा पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तीस दिला जावा, असे प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने निश्चित केल्यानंतर समोर आलेल्या काही नावांमधून कुबेर यांचे नाव एकमताने निश्चित झाले.

विश्वस्त मंडळाच्या बैठकीस अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्रा. प्रताप बोराडे, डॉ. प्रभाकर पानट, संजीव कुळकर्णी, डॉ. मंगेश पानट, डॉ. सुनीता धारवाडकर, श्रीकांत उमरीकर व डॉ. सविता पानट उपस्थित होते. या उपक्रमातील पहिला पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स’चे तत्कालीन संपादक गोविंदराव तळवलकर यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांच्याच संपादकीय संस्कारांखाली पत्रकारिता क्षेत्रात नावारूपास आलेल्या कुबेर यांचा अनंत भालेराव स्मृती प्रतिष्ठानकडून गौरव होत आहे. त्यानंतरच्या काळात ‘लोकसत्ता’चे संपादक डॉ. अरुण टिकेकर, कुमार केतकर तसेच विजय तेंडुलकर, पी. साईनाथ यांच्यासारख्या दिग्गजांना प्रदान करण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुबेर गेली साडेतीन दशके पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्रांत अनेक वर्षे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर मागील एक तपापासून ते ‘लोकसत्ता’चे संपादकपद भूषवत आहेत. वृत्तपत्रीय लिखाणाशिवाय कुबेर यांनी वेगवेगळय़ा विषयांवर विपुल लेखन केले. त्यांची ‘अधर्मयुद्ध’, ‘एका तेलियाने’, ‘टाटायन’, ‘युद्ध जीवांचे’, ‘तेल नावाचे वर्तमान’ ही ग्रंथसंपदा वाचकप्रिय ठरली आहे. ‘लोकसत्ता’तील त्यांच्या निवडक अग्रलेखांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘टाटायन’ या पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीला प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.