छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र व साधने प्रकाशन समितीकडून प्रकाशित करण्यात येणारे आणखी तीन खंड प्रकाशनासाठी सज्ज आहेत. येत्या १ ऑगस्ट या जयंती दिनी प्रकाशन करण्याचा समितीचा मानस असून, त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयींच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
समितीकडून अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र वाङ्मयाचे चार खंड यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. या चार खंडांचे प्रत्येकी दोन भाग मिळून आठ ग्रंथांचा संच काढण्यात आला आहे. आता खंड क्रमांक पाच हा कथासंग्रहाचा, क्रमांक सहा हा लोकनाट्य व नाटकांशी संबंधित तर खंड क्रमांक सात हा शाहिरी आणि प्रवास वर्णनाचा (माझा रशियाचा प्रवास) आहे. हे तिन्ही खंड ग्रंथ रूपात तयार झाले आहेत.
याशिवाय अण्णा भाऊंचे लोकयुद्ध, युगांतर, मशाल अशा नियतकालिकांमध्ये समीक्षात्मक, पाश्चात्त्य लेखकांच्या कादंबऱ्यांचे परीक्षण, अन्य वाङ्मयावरील भाष्य, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देताना अण्णा भाऊंनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढलेला होता आणि त्यासंदर्भातील त्यांचे पोवाडे आदी प्रकाशित साहित्यही पुस्तक रूपात समोर आणण्यात येणार आहे. त्याचेही काम सुरू आहे. अण्णा भाऊंच्या यापूर्वी प्रकाशित चार खंडांच्या आठ भागांतील समग्र वाङ्मयाचाही हिंदी भाषेत तर ३० कादंबऱ्यांचा इंग्रजीत अनुवाद सुरू आहे. त्याचेही काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती साठे चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्राचार्य डाॅ. संजय शिंदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
अण्णा भाऊंचे समग्र वाङ्मय दृक-श्राव्य आणि ई-बुक्स माध्यमातूनही तयार होत असून, त्याचेही काम अंतिम टप्प्यात आहे. खंड क्र. ५, ६ व ७ ग्रंथ रूपात सज्ज असून, त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – प्राचार्य डाॅ. संजय शिंदे, सदस्य सचिव, अण्णा भाऊ साठे चरित्र साधने व प्रकाशन समिती
डोळे या कथेवर लघुपट
अण्णा भाऊंच्या ‘डोळे’ या कथेवर कर्नाटकातील प्रो. कीर्ती रामचंद्रा या लघुपट निर्माण करत आहेत. अण्णा भाऊंवरील चित्रपटाबाबतही चर्चा सुरू आहे, अशी माहितीही प्राचार्य डाॅ. संजय शिंदे यांनी दिली.