छत्रपती संभाजीनगर : पुढील वर्षी जूनमध्ये (२०२६) होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगरमधून निर्मिती करण्यात आलेल्या ‘माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटाची अधिकृत निवड झाल्याचे पत्र मिळाल्याची माहिती संबंधित लेखक, निर्माते-दिग्दर्शक प्रकाश त्रिभुवन यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगरच्या अवलोकितेश्वर प्राॅडक्शनअंतर्गत निर्मित या चित्रपटाबाबत प्रकाश त्रिभुवन यांनी सांगितले की, चित्रपट निर्मितीचा पहिलाच अनुभव आहे. ही प्रक्रिया अत्यंत मार्मिक आणि सामाजिक आशयघन असते. ९० च्या दशकात श्रीराम सेंटर फॉर आर्ट्स ॲण्ड कल्चर या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये सादर झालेल्या आमच्या ‘थांबा रामराज्य येतेय’ या नाटकाची राज्यभर मोठी चर्चा झालेली होती. जगाच्या विविध भागांत हे नाटक पोहोचले होते.
चित्रपटाबाबत त्रिभुवन म्हणाले, ‘माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ या चित्रपटातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अर्धांगिनी माईसाहेब यांच्या वाट्याला मानवतेच्या दृष्टिकोनातून हेतूपुरस्सर आणले गेलेले खडतर आयुष्य पारदर्शकपणे मांडले आहे. माईसाहेब यांच्याविषयी फारच थोड्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य नेमके कसे होते, याविषयी आंबेडकरी जनतेत उत्सुकता आहे. माईसाहेबांचे ‘डाॅ. आंबेडकरांच्या सहवासात..’ या आत्मचरित्रात काही माहिती, तपशील असून, त्याचाही आधार चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेत झाला.
या चित्रपटात शैलेश दातार, पल्लवी पालकर, शंतनू मोघे, माधव अभ्यंकर, कमलेश सावंत, अनिल नगरकर, डॉ. विजयकुमार देशमुख, शाहिरा सीमा पाटील हे प्रमुख भूमिकेत असून स्थानिक आणि महाराष्ट्रातील नामांकित कलावंत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबर २०२५ ला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची निवड झाली आहे, असे प्रकाश त्रिभुवन यांनी सांगितले.