छत्रपती संभाजीनगर : बीडमधील मराठा समाजाच्या नेत्यास १९८० नंतर म्हणजेच गेल्या ४५ वर्षांत कधीच कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले नाही. सुंदरराव सोळंके यांच्यानंतर नेहमी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मराठा मतदार संख्येने जास्त असला तरी नेता निवडताना ‘ओबीसी’ चेहऱ्यासच प्राधान्य दिले. हा निकष शरद पवार यांच्या कार्यकाळातही होता आणि आता अजित पवारही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत, अशा शब्दांत माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याची खंत व्यक्त केली.
‘माझे वडील सुंदरराव सोळंके यांच्यानंतर कधीच मराठा नेत्याला मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद दिले नाही. या निकषात अगदी अनुसूचित जातीच्या व्यक्तींना स्थान होते. बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेते पदी ‘ओबीसी’ चेहराच हवा हा निकष का लावला गेला, हे मला सांगता येणार नाही. पण निर्णय घेणाऱ्यांनी मराठा नेतृत्वाला डावलले. खरेतर मराठा मतदारांची संख्या जास्त असतानाही असे निर्णय का घेतले गेले, हे मला सांगता येणार नाही, असे प्रकाश साेळंके ‘लोकसत्ता’ शी बोलताना म्हणाले.
ही स्थिती सर्व पक्षीय असून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, विमल मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे अशी ओबीसी नेतृत्वाची फळी या जिल्ह्यात होती. मात्र, गेल्या ४५ वर्षांत एकदाही मराठा नेतृत्वाला संधी देण्यात आली नाही. मंत्रिमंडळ बदलाची चर्चा सुरू झाल्यानंतर प्रकाश साेळंके यांनी व्यक्त केलेल्या या भावनांमुळे राष्ट्रवादीतील खदखद पुढे आली आहे. ते म्हणाले, ‘मंत्रिमंडळ करण्यापूर्वी अनेकदा भेटून अजित पवार यांनाही अनेकदा ही बाब सांगितली आहे. पण त्यांच्यावरही सांगण्याचे काही परिणाम होत नाहीत, असेच दिसून आले आहे.’
माजलगाव मतदारसंघातून प्रकाश सोळंके हे चार वेळा निवडून आलेले आमदार आहेत. या मतदारसंघातून त्यांना दोन वेळा पराभूत व्हावे लागले होते. अपक्ष, भाजप, राष्ट्रवादी असा पक्षीय प्रवास करणारे प्रकाश साेळंके यांचा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात प्रवेश हाेऊ शकतो, असा दावा त्यांचे समर्थक करत. मात्र, सुनील तटकरे यांनी बीड येथील कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचे पक्षातील स्थान अबादीत राहील, असे अलीकडेच बीडमधील कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना खरेदी प्रकरणातून ‘क्लिन चीट’ मिळाल्याचे सांगत त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, असे संकेत दिले. त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय पटावर नव्या चर्चांना उधाण आले आहे. अशा स्थितीमध्ये प्रकाश सोळंके यांनी मराठा नेतृत्वाकडे कसे दुर्लक्ष केले गेले, याचा तपशील सांगत खंत व्यक्त केली आहे.