महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हंडा मोर्चाद्वारे निषेध

औरंगाबाद : राज्यपातळीवर शिवसेना-भाजपचा काडीमोड झाल्यानंतर त्याचे पडसाद तीव्रतेने उमटू लागले आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेतून भाजपा सत्तेतून बाहेर पडली आहे. आता शहरासाठीच्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेआडून भाजप नगरसेवक-नगरसेविकांनी महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून प्रवेशद्वारासमोर तासभर ठिय्या मांडला.

या वेळी महापौर नंदकुमार घोडेले यांचा राजीनामा मागत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शेरेबाजी केली.

उपमहापौरपदाचा नुकताच राजीनामा दिलेले विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या हंडा मोर्चादरम्यान, उद्धव ठाकरे हाय, हायसह महापौरांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणांचा आवाज मोठा होता. मनपा पदाधिकाऱ्यांनी शहराची स्थगित केलेली पाणीपुरवठा योजना पूर्ववत करावी.

शहराला सुरळीत पाणीपुरवठा करावा, आदी मागण्यांचे फलक भाजप नगरसेवकांनी प्रवेशद्वारासमोर झळकावले.

या संदर्भात माध्यमांशी बोलताना माजी उपमहापौर विजय औताडे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. त्याचा निषेध करत असल्याचे सांगत औताडे यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले.

आंदोलनात अ‍ॅड. माधुरी अदवंत, शिवाजी दांडगे, प्रमोद राठोड, प्रशांत देसरडा, दिलीप थोरात आदींसह अनेक नगरसेवक सहभागी झाले होते.

राजीनामा देणे हा पळपुटेपणा

आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. राजीनामा देऊन शहराला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले आहे. आम्ही काम करणार आहोत. राजीनामा देण्यासारखे पळपुटे धोरण स्वीकारणार नाही, असे सांगत महापौर नंदकुमार घोडेले यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचे सदस्य विजय औताडे यांना उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्यावरून टोला लगावला.