छत्रपती संभाजीनगर : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास अगोदर तब्बल आठ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ३३ उपशिक्षणाधिकारी आणि समकक्ष अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेला अखेर मुहूर्त मिळाला. यातून राज्याला २३ उपशिक्षणाधिकारी, ३ गटशिक्षणाधिकारी, ३ वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक, ३ उपनिरीक्षक आणि शिक्षण मंडळातील एक प्रशासक असे अधिकारी मिळाले आहेत. परंतु या अधिकाऱ्यांना पदस्थापनेसाठी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत धाव घेऊन लढा द्यावा लागला आणि पाच आठवड्यांत पदस्थापना देण्याचा आदेश २९ एप्रिल २०२५ रोजी दिला असतानाही सहा महिने प्रतीक्षा करावी लागल्याने ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ या प्रशासनाच्या कारभारावरील उक्तीचा अनुभव नव्याने पदभार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आल्याचे अधोरेखित झाले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ नोव्हेंबर रोजी वरील ३३ शिक्षणाधिकारी व समकक्ष अधिकाऱ्यांना पदस्थापना देण्याबाबतचा अध्यादेश जारी केला. या पदांसाठी २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेण्यात आली होती. पुढे करोना, काही मुद्द्यांवर न्यायालयीन प्रक्रिया यातून उमेदवारांना जावे लागले. त्यातूनही काहींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांच्या निवडीत कुठल्याही तांत्रिक अडचणी नव्हत्या, त्या गटानेही सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे बाजू मांडली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे ३३ उपशिक्षणाधिकारी व समकक्ष अधिकाऱ्यांची पदस्थापना पाच आठवड्यांत करण्याचा आदेश होता.

महसूल विभागनिहाय पदस्थापना

छत्रपती संभाजीनगर व पुणे महसूल विभागांतर्गत प्रत्येकी ७, नागपूर विभागात ६, अमरावती व नाशिक विभागाला प्रत्येकी ४, तर कोकण-२ ला तीन, तर कोकण-१ ला दोन उपशिक्षणाधिकारी किंवा समकक्ष अधिकारी मिळाले आहेत.

या जिल्ह्यांना मिळाले उपशिक्षणाधिकारी

जालना, रत्नागिरी, भंडारा व अकोला या जि. प. ला प्राथमिक व माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, नाशिकला प्राथमिक, माध्यमिक असे प्रत्येकी दोन मिळून चार उपशिक्षणाधिकारी, सोलापूरला जि.प. व महापालिकेसह तीन, अकोला, परभणी, वाशीम, वर्धा व कोल्हापूरला प्राथमिक, तर सातारा, पुणे जि. प. माध्यमिक उपशिक्षणाधिकारी मिळाले. नांदेडसह देगलूर, शहापूरला (ठाणे) गटशिक्षणाधिकारी, तर कोकण-२ (बृहन्मुंबई), कोल्हापूर व नागपूरला शिक्षण उपनिरीक्षक मिळाले. वर्धा जि. प. ला शिक्षणाधिकारी, योजनासाठी एक उपशिक्षणाधिकारी, तर बृहन्मुंबई, जालना आणि लातूरला वेतन व भविष्य निर्वाह निधीपथक अधीक्षक मिळाले.