छत्रपती संभाजीनगर: या वर्षातील फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचा ९२.८२ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात २.३७ टक्क्यांनी घट झाली आहे. तर, विभागातील नऊ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला असून, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील दाेन, परभणीतील पाच, जालना व हिंगोलीतील प्रत्येकी एक शाळा आहे.
तर पाच जिल्ह्यांतील मिळून ६८७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.निकालात घट होण्यामागे यंदा मुख्यमंत्री स्तरावरूनच प्रभावीपणे काॅपीमुक्त अभियान राबवण्याच्या सूचना होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी महसूल, पोलीस, शिक्षण विभागाने प्रभावीपणे केल्यामुळे निकालात घट झाल्याचा दावा, विभागीय अध्यक्ष अनिल साबळे व सचिव डाॅ. वैशाली जामदार यांनी पत्रकार बैठकीत केला.
यंदाचे निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे काॅपीमुक्त अभियानामुळे निकालासह प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये या वर्षी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ हजार २७६, तर प्रथम श्रेणीमधील संख्या ५५ हजार ७१ एवढी आहे. गतवर्षी प्रावीण्यासह ७९ हजार ३०७, तर प्रथम श्रेणीमध्ये ५६ हजार ८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
गतवर्षी दहावीच्या परीक्षेला एकूण प्रविष्ट १ लाख ८२ हजार ८४४ पैकी १ लाख ७४ हजार ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या वर्षी १ लाख ८३ हजार ९५७ प्रविष्टपैकी १ लाख ७० हजार ७५० उत्तीर्ण झाले आहेत.पाच जिल्ह्यांतील मिळून २ हजार ६८९ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ६४४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी ६४ परीरक्षक, ६४४ रनर, ७ हजार ६०० पर्यवेक्षक, ९ मुख्य नियामक, १ हजार ४५३ नियामक व ७ हजार ३४७ परीक्षक कार्यरत होते.
क्रीडा विभागाचे ३ हजार ५०१ प्रस्ताव आले असून, त्यांतील ३ हजार ३०१ पात्र ठरले. कला क्षेत्रातील १८ हजार ५२४ प्रस्ताव पात्र ठरल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली. या वेळी माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची उपस्थिती होती.
निकालात बीड अव्वल
विभागात निकालामध्ये बीड जिल्हा अव्वल ठरला आहे. बीडचा निकाल ९६.४७ टक्के, छत्रपती संभाजीनगरचा ९३.६०, जालन्याचा ९१.४४, परभणीचा ८९.२४ तर हिंगोलीचा निकाल ८९.०७ टक्के लागला. या पाच जिल्ह्यांतील मिळून उत्तीर्ण १ लाख ७० हजार ७५० विद्यार्थ्यांमध्ये ९३ हजार १७४ मुले, तर ७७ हजार ५७६ मुली आहेत. उत्तीर्णांमध्ये मुलींची टक्केवारी ९५.५०, तर मुलांची ९०.७० टक्के आहे. परभणी जिल्ह्यात ६६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे, तर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या सहा हजार ९२५ आहे.
लातूर मंडळाचा निकाल ९२.७७ टक्के
लातूर शिक्षण मंडळाचा निकाल ९२.७७ टक्के लागला आहे. लातूरमधील धाराशिवचा ९५.३७, तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२१ टक्के इतके आहे. लातूर विभागात बारावीच्या परीक्षेत दुसऱ्या स्थानावर असलेला नांदेड जिल्हा दहावीच्या निकालात तिसऱ्या स्थानी गेला आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.१५, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२१ इतके आहे. नांदेडमधील १६ तालुक्यांपैकी सर्वाधिक निकाल मुखेड तालुक्याचा ९८.४० टक्के लागला.