छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यातील अतिवष्टीमुळे फटाके वाळवता आले नाही. परिणामी उत्पादन ४० टक्के कमी झाले. विशेषत: सुतळी बॉम्ब वाळले नाहीत. तसेच अन्य फटाक्यांचे झाले आहे. सर्व वस्तूंवरचा वस्तू सेवा कर कमी झाला असला तरी फटक्यांवर कर जशास तसा म्हणजे १८ टक्के कायम आहे. त्यामुळे फटाक्याला अतिवृष्टीचा फटका आहे.

फटक्यांच्या कारखान्यात सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात काम सुरू होते. वर्षभर फटक्याची दारू, ती दारु फटक्यात भरण्याचे बहुतांशी काम मजुरांमार्फत केले जाते. मराठवाड्यात वाशी तालुक्यातील तेरखेडा या गावी फटक्याचे अनेक कारखाने आहेत. या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला तो दिवाळीपर्यंत कायम राहिला. पुरेशी उघडीप न मिळाल्याने फटका उत्पादन घटलेले आहे.

धाराशिव जिल्ह्यात एकूण ४८ परवानाधारक फटाका उत्पादक आहेत. त्यातील ३१ फटाका उत्पादक हे तेरखेडा आणि परिसरात फटाका निर्मितीचे काम करतात. येथील तेरखेडी तोटा हा फटका प्रसिद्ध आहे. सुतळी बॉम्ब, मातीचे भुईनळे, रंगीत आकर्षक फटाके, राजकीय कार्यक्रमांना लागणार्‍या आदल्याही येथे बनविल्या जातात. तेरखेडा गावातून फटाक्यांना वर्षभर मागणी असते. त्यातून हजाराहून अधिक कुटुंबांना रोजगारही मिळतो. मात्र, तयार फटाके वाळविण्यासाठी हवा असलेला वेळच मिळाला नाही.

तेरखेडा येथील फटाका उद्योगाचा इतिहासही मोठा रंजक आहे. निजामाची राजवट संपल्यानंतर निजाम दरबारी दारूकाम करणार्‍या कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली. त्यातूनच हुसेन नवाज सय्यद दारूवाले, अब्बास नवाज सय्यद दारूवाले आणि इब्राहीम मुल्ला आदींनी तेरखेड्यात फटाका उद्योगाची सुरूवात केली. आता त्यांची पुढची पिढी या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात पुढे घेवून जात आहे. खर्‍या अर्थाने सन १९८२ साली तेरखेडा येथे फटाका निर्मितीस प्रारंभ झाला. जे. के. फायर वर्क्स, अब्बास फायर वर्क्स आणि चातक फायर वर्क्स या तीन कारखान्यांनी उत्पादन सुरू केले. आता या कारखान्यांची संख्या ६६ एवढी आहे.

या कारखान्यांच्या परिसरात वीज लागत नाही. ठिणगी निर्माण करणारे काहीही या परिसरात नेले जात नाही. खूप काळजी घेतली तरी काही वेळा या परिसरात अपहातही झाले आहेत. मागील १२ वर्षांत तीनवेळा स्फोट होऊन १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वर्षी मात्र फटका उत्पादक कुटुंबाना पुरेसा रोजगार मिळू शकला नाही. उघड्यावर करण्याचे कामही खोल्यांमध्ये करुन तिथेच ते वाळवावे लागल्याचे फटाके उत्पादक सांगतात.