छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या ७३ प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया आता पुन्हा नव्याने करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून मान्यता मिळालेल्या या पदांसाठी यापूर्वी ५ हजारांवर अर्ज आले होते. आता पुन्हा नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. तर विद्यापीठातील अधिष्ठात्यांसह सांविधानिक अधिकाऱ्यांच्या आठ जागांसाठी राज्य शासनाच्या मान्यतेनंतर सात दिवसांची मुदत देऊन अर्ज मागविण्यात येणार आहेत. कुलसचिवपदासाठी नव्याने जाहिरात देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिल्याची माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

अधिष्ठाता चार पदे, संचालक नवोपक्रम, संचालक-धाराशिव उपपरिसर, संचालक आजीवन शिक्षण विभाग व संचालक ज्ञान स्रोत केंद्र या आठ पदांसाठी शासनाची मान्यता मिळाल्यानंतर सात दिवसांची मुदत देऊन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांसाठी एप्रिल २०२५ मध्ये अर्ज मागविण्यात आले. या पदासाठी शासनाकडून भरती करण्यास अद्यापही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पदभरतीस शासन मान्यता मिळाल्यानंतर सात दिवसांची मुदत देऊन अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व पदासाठी राज्य शासनाची मान्यता घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडलेले २० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. बैठकीस प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह १५ सदस्य उपस्थित होते. विद्यापीठाच्या वतीने सहा संस्थांसमवेत सामंजस्य करार करण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ व बलवंत विद्यापीठ, आग्रा, एमजीएम विद्यापीठ, ऑटोमॅक इन्स्टिट्यूट – बोईसर, एन्ड्रेस -हौंजर ऑटोमेशन इन्टू मेंटेशन, टीम पल्स एमआर सर्व्हिसेस या संस्थेचा समावेश आहे.

खरेदी समितीवर डाॅ. दासू वैद्य

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम – नुसार विद्यापीठ विभागातून खरेदी समितीवर मराठी विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य यांचे नामनिर्देशन करण्यात आले. तर महाराणा एजन्सी सेक्युरिटी ॲण्ड लेबर सप्लायर्स यांचा करारनामा रद्द करण्यात आला. तत्कालीन निविदा प्रक्रियेतील निविदाधारक आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, धुळे यांना सेवा पुरवठा करण्यास तात्पुरत्या करारनाम्यास मान्यता देण्यात आली. पैठण येथील संतपीठाच्या संदर्भाने करावयाच्या मूलभूत सुविधांचे ढोबळ अंदाजपत्रक मांडण्यास मंजुरी देण्यात आली.

अधिसभेची ३० रोजी बैठक

विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या ३० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी या तारखेस बैठक घेण्यास मान्यता दिली आहे. बैठकीत प्रश्नोत्तराचा तास असणार आहे.