छत्रपती संभाजीनगर – मका खरेदीच्या व्यवहारात २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याच्या तणावात विष घेतलेल्या व्यापाऱ्याचा १८ जून रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी शुक्रवारी (२० जून) मृत व्यापाऱ्याचे भाऊ सुखदेव उत्तमराव निकम यांच्या फिर्यादीवरून राजू पुंजाजी पाडसवान याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील हडको भागातील सुखदेव निकम (वय ४४) मूळचे पिशोर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार बंधू रघुनाथ उत्तमराव निकम हे भुसार मालाचे व्यापारी होते. तर आरोपी राजू पुंजाजी पाडसवान हाही भुसार मालाचा व्यापारी आहे. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने त्यांची ओळख होती. राजू पाडसवान याने कमी दरात मका देण्याचे आमिष भाऊ रघुनाथ याला दाखविले. या व्यवहारातून चांगला नफा होईल, असे आमिष दाखविले होते. या आमिषाला रघुनाथ बळी पडले. त्यानंतर रघुनाथ यांनी २२ लाख रुपये राजूला दिले.
तब्बल २२ लाखांची रक्कम दिल्यानंतर मका देण्याची मागणी रघुनाथ यांच्याकडून केली जात होती. परंतु राजू विविध कारणे देऊन टाळाटाळ करीत होता. मात्र काही काळाने राजूने मकाही दिला नाही आणि २२ लाख रुपयेही परत केले नाहीत. उलट शिवीगाळ व धक्काबुकी करून पैसे परत करण्यास नकार दिला. तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याने रघुनाथ निकम हे तणावात गेले. काही काळ ते विविध ठिकाणी भटकत होते.
याच तणावातून १५ जून रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी शरणापूर ते दौलताबाद रोडवरील शेळके मामाच्या ढाब्याच्या पुढे रस्त्यात विषारी द्रव पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब या रस्त्यावरून जाणाऱ्यांना दिसून आली. त्यांनी घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना १८ जून रोजी रघुनाथ यांचा मृत्यू झाला.
राजू पाडसवान याने केलेल्या फसवणुकीमुळे तणावात गेेलेल्या भावाने विष पिऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला राजूच जबाबदार असल्याचे सुखदेव निकम यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावरून राजू पाडसवान याच्याविरुद्ध दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक बोडखे करीत आहेत.