छत्रपती संभाजीनगर : पवनऊर्जा प्रकल्पात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या ‘आवादा’ कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधार आहे. याबाबत राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने दोषारोपपत्र सादर केले.

कराडचा आवाज आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या आवाजाचे एकमेकांशी जुळणारे नमुने, हत्या प्रकरणातील आरोपींचा खंडणीच्या गुन्ह्याशी असणारा संबंध दाखविणाऱ्या ‘सीसीटीव्ही’ चित्रणासह दोषारोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १८० साक्षीदार, पंच यांच्या मदतीने तपास केल्यानंतर या गुन्ह्यात सूत्रधार वाल्मीक कराड असल्याने त्यास पहिल्या क्रमांकाचा आरोपी करण्यात आले आहे. त्याच्यासह आठ जणांविरोधात पुरावे सादर केले आहेत. तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासातील ‘डिजिटल’ स्वरूपाचे पुरावे न्यायवैद्याक प्रयोगशाळेकडून तपासून तयार करण्यात आले आहेत.

खंडणीच्या गुन्ह्यात ‘आडवे आले म्हणून संपवा अन्यथा आपण भिकेला लागू’, असे म्हणत वाल्मीकच या गुन्ह्यातील सूत्रधार असल्याचे दोषारोपात म्हटले आहे. या आरोपींमधील सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार संघटित गुन्हेगारी करत होते. त्याने व त्याच्या साथीदाराने केज, अंबाजोगाई, धारूर व धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे १० वर्षांत ११ गुन्हे केले असल्याचे दोषारोपात म्हटले आहे.

तपशील काय?

८ ऑक्टोबर २०२४ रोजी आवादा एनर्जी प्रा. लि.चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून त्याच्या परळी येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटले. त्या वेळी विष्णू चाटे हा हजर होता. या वेळी वाल्मीक कराड याने, ‘कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीची सर्व कामे बंद करा.’ अशी धमकी दिली. पुढे याच मागणीसाठी २९ नोव्हेंबर रोजी ‘वाल्मीक अण्णाची डिमांड पूर्ण करा आणि भेट घ्या. तोपर्यंत काम चालू करू नका.’ अशी सुदर्शन घुले याने धमकी दिली.

संतोष देशमुख यांना धमकी

आवादा एनर्जी प्रा.लि.चे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करून सरपंचाला या घटनेबाबत सांगितले. त्यावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांना विनंती करून, ‘कंपनी बंद करू नका. लोकांना रोजगार मिळू द्या.’ असे सांगितले. त्या वेळी सुदर्शन घुले याने खंडणी मागण्यात अडथळा निर्माण करत असल्याने संतोष देशमुख यांना सरपंच तुला बघून घेतो. जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

या दिवशी कटाची चर्चा

●२९ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयात बैठक घेऊन आवादा एनर्जी प्रा. लि. कंपनी २ कोटी रुपये खंडणी देत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

●त्याकरिता काय करावे लागेल याची चर्चा केली. या वेळी प्रतीक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे कटामध्ये सामील झाले.