छत्रपती संभाजीनगर : मराठी नववर्षांतला पहिला सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला मान असलेल्या साखरेच्या गाठी तयार करणे हा महाराष्ट्रातील काही घटकांचा पारंपरिक व्यवसाय असून, त्यांना आता गुजरातमधून येणाऱ्या गाठींशी स्पर्धा करावी लागत आहे. त्या स्पर्धेतून गाठीच्या बाजारपेठेत पारंपरिक शुभ्र गाठींसोबतच भगव्या, गुलाबी रंगांच्या गाठी व नगर जिल्ह्यात मागणी असलेला कंगनप्रकारही पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पूर्वी साखरेचे हार (गाठी) बनविणारे कारागीर होते. मात्र अलीकडे व्यावसायिक गणिते नफ्याची करण्यासाठी कारागीर मंडळींनी आपला मोर्चा शहरांकडे वळविला. तेथे व्यवसायाची घडी बसली असतानाच आता त्यांची गाठ गुजरात राज्यातून येणाऱ्या साखरेच्या गाठींशी पडली.

हेही वाचा >>>‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

भूम शहरातील रेवडकर कुटुंबीय तीन पिढय़ांपासून गाठी तयार करण्याच्या व्यवसायात असून त्यांच्याकडील गाठींना  धाराशिवसह सोलापूर, लातूर, नगर, कल्याण, बीड, पुणे, मुंबई, बारामती या भागातून मोठी मागणी असते. व्यवसायाच्या संदर्भाने हेमंत रेवडकर, गणेश रेवडकर यांनी सांगितले, की  या वर्षी बालगोपाळांना आकर्षित करण्यासाठी कंगन हार तयार केले आहेत. कंगन जोडीची किंमत ४० रुपये आहे. कंगन हा प्रकार नगर जिल्ह्यात अधिक प्रचलित आहे. तेथे लहान मुलांना होळीपासूनच कंगन दिले जाते. बांगडीमध्ये राणी-गुलाबी, लाल, पिवळा असे विविध आकर्षक रंग आहेत. त्याचा ठोक भाव ७० ते ७५ रुपये दर प्रतिकिलो आहे. किरकोळ दर ११५ ते १२० रुपये प्रतिकिलो आहे. या वर्षी ६५ ते ७० क्विंटल साखरेच्या हाराची विक्री होईल. गाठीच्या व्यवसायासाठी आवश्यक अपेक्षित मजूरवर्ग मिळत नाही. घरातीलच सदस्यांना गाठी तयार करण्याच्या कामामध्ये सहभागी करून घ्यावे लागते.

अलीकडच्या काळात गुजरातमधून मोठय़ा प्रमाणात गाठी बाजारपेठेत येत आहेत. तेथे मोठय़ा यंत्रांमधून गाठय़ांची निर्मिती केली जाते. आपल्याकडे साच्याच्या पारंपरिक पद्धतीतून गाठी बनवल्या जातात. गुजरातेतील गाठी अधिक शुभ्र दिसते, परंतु कालांतराने ती पिवळी पडते. आपल्याकडील गाठी वर्षभरानंतरही पिवळी पडत नाही. गुजरातमधील गाठींमध्ये काही रासायनिक द्रवाचे मिश्रण केले असण्याची शक्यता असू शकेल. यंदा प्रथमच गुलाबी, भगव्या गाठींची निर्मिती केली आहे. तीही गुजरातच्या गाठीशी होणाऱ्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. – हेमंत रेवडकर,  गाठी व्यावसायिक, भूम