नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर जिल्हा बँक आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या एका जिल्हाध्यक्षास पक्षात ओढल्यानंतर आता काँग्रेसमधील याच पदाच्या संभाव्य उमेदवारालाच भाजपमध्ये प्रवेश करण्याचे वेध लागले असून, खासदार चव्हाण यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे.
भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्ते बालाजी रामजी कदम यांना दोन महिन्यांपूर्वी भाजपत दाखल करून घेण्यात आले. कदम तेव्हा काँग्रेसच्या उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांना भाजपमध्ये आणण्यात किशोर स्वामी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर भोकरमधील काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यास भाजपमध्ये आणण्याच्या बोलाचाली बुधवारी स्वामी यांच्या भाग्यनगरातील निवासस्थानी झाल्याची माहिती बाहेर आली आहे.
काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या भाग्यनगरमधील संपर्क कार्यालयाच्या अलीकडे किशोर स्वामी यांचे निवासस्थान आहे. बुधवारी सायंकाळनंतर त्यांच्या निवासस्थानी खासदार अशोक चव्हाण आले होते. तेथे त्यांची भोकरमधील काँग्रेसच्या वरील पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाल्याची माहिती बाहेर आली; पण स्वामी यांच्याकडे गुरुवारी थेट विचारणा केली असता, त्यांनी मोठ्या शिताफीने वरील विषयावर अधिक काही सांगण्याचे टाळले.
अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर भोकरमधील त्यांच्या अनेक समर्थकांनी काँग्रेस पक्ष सोडला, पण सुभाष किन्हाळकर, बाळासाहेब रावणगावकर, गोविंद बाबा गौड आदी प्रमुख कार्यकर्ते काँग्रेससोबत राहिले. यांतील रावणगावकर मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता ज्यास भाजपमध्ये ओढले जात आहे, त्याच्या नावाचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी विचार सुरू होता; पण त्याआधीच या पदाधिकाऱ्याच्या भाजपप्रवेशाची नेपथ्यरचना पूर्ण झाली आहे.
दरम्यान, बी. आर. कदम यांनी बुधवारी सकाळी खासदार अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. भाजपमध्ये गेल्यानंतर कदम यांनी आपल्या गणपूर गावातील सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध काढली. ते स्वतः संचालक झाले आहेत. वरील भेटीमध्ये खासदार चव्हाण यांनी नव्या संचालकांचे अभिनंदन केले. जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीची तयारी कदम यांनी सुरू केल्याचे या निमित्ताने मानले जात आहे.
भोकरमधील काँग्रेसचा एक पदाधिकारी भाजपत जाण्याच्या तयारीत असताना अर्धापूर तालुक्यातील विलास देशमुख-पिंपळगावकर यांच्या नेतृत्वाखालील काही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेशसोहळा लवकरच होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आत्माराम कपाटे यांनी दिली.
भेटीला दुजोरा
भोकरमधील वरील पदाधिकाऱ्याने काँग्रेस सोडण्यासंदर्भात कोणतेही वक्तव्य केले नाही; पण खासदार अशोक चव्हाण यांची स्वामी यांच्या घरी भेट झाल्याचे मान्य केले. ‘ते आमचे जुने नेते आहेत, भेट घ्यावीच लागते,’ असे ते म्हणाले.