छत्रपती संभाजीनगर : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पाली व बुद्धिझम विभागासह जवळपास डझनभर विभागांमधील अभ्यासक्रम शिकवण्यासाठी कंत्राटी प्राध्यापक, तर काही विभाग एकशिक्षकी, दोन शिक्षकी असल्याचे एक चित्र समोर आले आहे. व्यवस्थापन परिषदेतील ११२ कंत्राटी प्राध्यापकांना मुदतवाढ देण्याच्या निर्णयातूनही नवा वाद पेटण्याची चिन्हे असून, त्या संदर्भाने कुलपतींकडे तक्रार करण्यात आली आहे.
विद्यापीठाने संलग्नित चार जिल्ह्यांतील ११३ महाविद्यालयांमधील पदव्युत्तरचे प्रवेश प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, भौतिक सुविधा नसणे आदी कारणास्तव थांबविण्याचा निर्णय अलीकडेच घेतला असून, त्याची वेगवेगळ्या अर्थाने चर्चा होत असताना विद्यापीठातील जवळपास डझनभर विभागांत सर्वच प्राध्यापक कंत्राटी असल्याची माहिती पुढे आली. पत्रकारिता अभ्यासक्रमासह इतर काही विभाग एक किंवा दोन प्राध्यापकांवर सुरू आहेत.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डाॅ. उमाकांत राठोड यांनी २५ जुलै रोजी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ११२ कंत्राटी प्राध्यापकांना मुदतवाढ देण्याचा ठराव विखंडित करावा, अशी मागणीही केली आहे. तर गतवर्षीच्या कंत्राटी भरतीमध्ये २२ जागांवर आरक्षण डावलल्याने त्यांना मुदतवाढ देण्याच्या विषयावर प्रतिबंध घालण्यात यावा, असे पत्र कुलपतींकडे पाठवले आहे.
पाली बुद्धिझम, नॅनो टेक्नाॅलाॅजी, इलेक्ट्राॅनिक सायन्स, फाॅरेन्सिक सायन्स, संगीत, योग, फुले-शाहू-आंबेडकर विचार अभ्यासक्रम, पुरातत्त्वशास्त्र, लिबरल आर्ट आदी अभ्यासक्रम कंत्राटी प्राध्यापकांमार्फत शिकवले जात असून, येथे पूर्णवेळ प्राध्यापक नियुक्त नाहीत.
कंत्राटी प्राध्यापक नियुक्त केलेल्यांमधील पाली व बुद्धिझम हा विभाग तेवढा अनुदानित आहेत. बाकी विभाग विनाअनुदानित आहेत. त्यातही विषयविशेष अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. पाली व बुद्धिझम विभागात येत्या काळात होणाऱ्या ७३ पदांच्या भरतीनंतर प्राध्यापक नियुक्त होईल. – डाॅ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
कंत्राटी प्राध्यापकांना मुदतवाढ देण्याविषयीची तरतूद ही विद्यापीठ अनुदान आयोग व विद्यापीठ कायद्यांमध्ये नाही. जर ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी कंत्राटी प्राध्यापकांची भरती केली, तर अनुदान आयोग व विद्यापीठ नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. यापूर्वीच्या २०२४-२५ मधील कंत्राटी भरतीतील १११ जागांवर आरक्षण डावलले असल्यामुळे संबंधित मुदतवाढ देण्याच्या विषयावर तत्काळ प्रतिबंध घालण्यात यावा, अशी तक्रार कुलपतींकडे केली आहे. याशिवाय २५ जुलै रोजीच्या व्यवस्थापन परिषदेचा मुदतवाढीचा ठरावही विखंडित करावा, अशी तक्रार करणार आहे. – डाॅ. उमाकांत राठोड, अधिसभा सदस्य.