सुहास सरदेशमुख  

छत्रपती संभाजीनगर : पुढील जवळपास दोन-अडीच महिने चालणाऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान होणाऱ्या चलन वाहतुकीवर आता नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. बँकांच्या चलन व्यवहार केंद्रांतील प्रत्येक रोकड वाहतुकीला ‘क्यूआर कोड’ दिला जाणार असून एका विशेष अ‍ॅपद्वारे सुरुवातीच्या ठिकाणापासून गंतव्य ठिकाणापर्यंत चलनाचा माग ठेवता येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात बँक किंवा पतसंस्थांमधील चलन असल्याचे भासवून पाठवण्यात येणाऱ्या काळय़ा पैशाला लगाम लावणे शक्य होणार आहे.

Voting was disrupted in many places due to malfunctioning of voting machines
बुलढाणा : मतदानयंत्र बिघडल्यामुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले… यंत्रणांची धावपळ…
adhirranjan choudhari
दुसऱ्या टप्प्यात ध्रुवीकरणाचा मुद्दा केंद्रस्थानी; १३ राज्यांत लोकसभेच्या ८९ जागांसाठी शुक्रवारी मतदान
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार

 ‘इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टीम’ नावाचे हे अ‍ॅप असून लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच ते कार्यान्वित होणार आहे. या अ‍ॅपद्वारे निवडणूक अधिकारी, बँका, प्राप्तिकर विभाग आदी सरकारी यंत्रणांना चलन वाहतुकीवर देखरेख ठेवता येणार आहे.

हेही वाचा >>>छत्रपती संभाजीनगर: पत्नीचा खून करून पती ठाण्यात हजर; चौघांवर गुन्हा दाखल

आचारसंहितेच्या काळात होणारी काळय़ा पैशाची देवाणघेवाण, मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे प्रयत्न होताना दिसतात. त्याचवेळी पारदर्शक पद्धतीने एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे पाठवण्यात येणारी रोकड कारवाईच्या कचाटय़ात अडकते. मात्र, नवीन अ‍ॅपमुळे हा घोळ टाळता येणार आहे.  चलन व्यवहाराच्या केंद्रामधून (करन्सी चेस्ट) निघालेली रक्कम आणि बँकांच्या शाखांपर्यंत तपासणी करणाऱ्या पथकाने आचारसंहितेत रक्कम जप्त केली, तर त्यांना संकेतांक दाखवून सुटका करवून घेता येईल. त्याचवेळी ‘क्यूआर कोड’ नसलेली रक्कम जप्त करून तातडीने कारवाई करणेही शक्य होईल.  अनेकदा ग्रामीण भागातील पतसंस्था, सहकारी पेढय़ांमधील चलन असल्याचे भासवून चलन वाहतूक करण्यात येते. प्रत्यक्षात ती त्या वित्तीय संस्थेपर्यंत पोहोचतच नाही. मात्र, नवीन यंत्रणेमुळे सुरुवातीच्या ठिकाणापासून निघालेली रोकड गंतव्य स्थानी पोहोचल्यानंतर तिची अधिकृत नोंदही ठेवली जाणार आहे. निवडणुकीदरम्यान एक लाखापेक्षा अधिकच्या व्यवहाराची माहिती दैनंदिन प्राप्तिकर विभागाकडेही आपोआप दिली जाते. त्यामुळे चलन व्यवहार आणि एकाच खात्यातून अनेक खात्यांमध्ये रक्कम जात असेल, तर त्यावरही देखरेख ठेवण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. उद्योग, बँकेचे अधिकारी, पोलीस, प्राप्तिकर, तसेच आर्थिक व्यवहारातील अनेकांना हे ‘अ‍ॅप’ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>घाटी रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक तीन हजार घेताना “लाचलुचपत” च्या सापळ्यात

डिजिटल व्यवहारांवर लक्ष

गेल्या काही दिवसांत छोटे व्यवहार भ्रमणध्वनीवर अ‍ॅपच्या आधारे केले जातात. मात्र, रोखीमधील मोठे चलन व्यवहार आता तपासता येणार आहेत.  देशातील बहुतांश व्यवहार डिजिटल होत असताना लोकसभा निवडणुकीत त्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. गेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये ‘चलन व्यवहारा’त मोठे बदल दिसून आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या विविध प्रशिक्षणांतून देण्यात आली आहे. दररोज बदलणारे चलन व्यवहार आणि निवडणुकांचा खर्च याचाही मेळ घातला जाणार असल्याचे अधिकारी सांगतात. या अ‍ॅपच्या आधारे सोन्या- चांदीच्या वस्तूंची खरेदी-विक्रीवाढही तपासता येणार आहे.

प्राप्तिकर विभागाला त्वरित सूचना

अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार म्हणाले की, वाहनातून होणाऱ्या प्रत्येक चलनाचा हिशेब देता आला नाही, तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडेही दिली जाणार आहे. या अ‍ॅपमध्ये चलनाची मागणी नोंद होईल, त्याचा संकेतांक तयार होईल. त्यामुळे पतसंस्था, नागरी बँकांमधून होणाऱ्या चलन व्यवहारावर आता नजर ठेवता येणार आहे.