छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतशिवार पाण्यात आहेत. अनेकांचे संसार अक्षरश: वाहून गेलेले आहेत. जनावरांच्या मृत्यूमुळे दूध उत्पादक हैराण आहेत. शेतकरी हवालदिल झालेला असताना तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आलेल्या महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी नाच गाण्याच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे टीका होत असून ही प्रशासनाची असंवेदनशिलता असल्याची टीका होऊ लागली आहे.

जिल्ह्यातील लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी या व्यासपीठावर गेले व कलाकारांनी त्यांना आग्रह केल्याने त्यांनी नाच केल्याचे सांगण्यात येत आहे. खरीप हंगामात अनेक मंडलात तीन व त्यापेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी झाली आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दौरे केले आहेत.

या दौऱ्याही जिल्हाधिकारी म्हणून कीर्तीकुमार पुजार सहभागी झाले होते. असे असताना त्यांनी पुन्हा नाच करुन असंवेदनशिलपणा दाखविल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी असे वागणे चुकीचे असल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे.

आमदार कैलास पाटील म्हणाले, अतिवृष्टीमुळे गंभीर स्थिती असताना पंचनामे करणे हा कामाचा प्राधान्यक्रम हवा. शासनाने दिलेली मदत पोहचलेली नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे हे वागणे पूर्णत: चुकीचे आहे. निरोप समारंभात गाणे म्हटले म्हणून एका तहसीदारास महाराष्ट्र सरकारने निलंबीत केले होते. मग आता जिल्हाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार?