छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही राजकीय टिप्पणीशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. गहिनीनाथ गडावर वैराग्यमूर्ती वामनभाऊमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित स्मृतिदिनी ते एकत्र आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री धनंजय मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत केले. या पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर जेवण घेतले. पण कोणतीही चर्चा झाली नाही, असे धनंजय मुंडे तसेच प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> राज्यात सव्वा लाखाहून अधिक ‘लखपती दीदी’

गहिनीनाथ गडावरील विविध विकासकामांसाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांची कामे आता पूर्णत्वास जातील, तसेच त्यात आणखी २५ कोटी रुपयांचा निधी व पंढरपूर येथील गहिनीनाथ गडाच्या जागेवर इमारत, तसेच वारीमार्गही पूर्ण केला जाईल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. महंत विठ्ठलमहाराज यांच्यामुळे या गडाचा विकास होत असल्याचेही ते म्हणाले. माणुसकी जपण्याचे आणि जात निर्मूलनाचे काम संतांनी केले होते. ती शिकवण राज्यघटनेत असल्याने या कार्यक्रमास आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. या वेळी आमदार धनंजय मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांचीही समयोचित भाषणे झाली.

गोळीबाराची वरिष्ठ स्तरावर चौकशी

गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. पोलीस ठाण्यात गोळीबार करण्यासारखे काय झाले होते, हेही समजून घ्यावे लागेल. पण या प्रकरणात निष्पक्ष चौकशी होईल, असे फडणवीस यांनी कार्यक्रम संपल्यानंतर या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबारप्रकरणी शासनच अपयशी

पूर्ण शासनच अपयशी ठरते आहे. शासन आमदारांवरती अवलंबून आहे. ते राजे झाले आहेत. आमदार शासनाला झुकवत आहेत. गृहमंत्री आणि मी एका कार्यक्रमात होतो. त्यांनी आदेश दिले आहेत असे म्हटले आहे. पण ते आदेश कोणते हे काही त्यांना विचारता आले नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.