छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची विरोधकांनी ज्याप्रमाणे कोंडी केली होती, तोच प्रकार आता महादेव मुंडे खुनाच्या घटनेतही दिसून येत आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना ‘बंगल्या’वरून फोन आल्यानंतरच पतीच्या खुनाचा तपास थंडावल्याचा आरोप केला असून, वाल्मिक कराडचे थेट नावच त्यांनी घेतले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

परळीजवळच्या कन्हेरवाडी व भोपळा ग्रामस्थांनी महादेव मुंडे प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करावे आणि आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी येत्या २५ जुलै रोजी रास्ता रोको करण्याची तयारी सुरू केली आहे. या माहितीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे स्थानिक नेते राजाभाऊ फड यांनी दुजाेरा देताना सांगितले की, ज्ञानेश्वरी या कन्हेरवाडीच्या लेक आहेत, तर भोपळा हे त्यांचे सासर आहे. त्यामुळे दोन्ही गावचे ग्रामस्थ एकत्र आंदोलन करण्याची तयारी करत असून, रीतसर प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. राजाभाऊ फड हे धनंजय मुंडे यांचे विरोधक मानले जातात.

महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बुधवारी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांची भेट घेतल्यानंतर अचानक विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून ज्ञानेश्वरी मुंडे या पोलीस प्रशासनावर पुन्हा संतापल्या असून, आपला एन्काऊंटर केला तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. महादेव मुंडे यांची हत्या (२० ऑक्टोबर २०२३) झाली त्यावेळी परळीत पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले सानप यांनी आठ दिवसात आरोपी अटक होणार असे आम्हाला सांगितले होते, परंतु नंतर बंगल्यावरून फोन आल्यामुळे तपास थांबवला आहे, असे त्यांनी आम्हाला सांगितल्याचा आरोपही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला.

बंगला म्हणजे धनंजय मुंडे यांचे निवासस्थान आणि तेथून वाल्मिक कराड हाच त्यांचा कारभार पाहात असल्याने त्यानेच फोन केल्याचा आरोप करत पोलीस निरीक्षक सानप यांच्या मोबाइल फोनचे संपर्क तपशील (सीडीआर) तपासावेत, अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. धनंजय मुंडे यांची आपल्या वडिलांनी तीनवेळा भेट घेतली होती, त्यांनीही तेव्हा तत्कालीन पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला होता, परंतु पुढे काहीच झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणात वाल्मिक कराडवरच पुन्हा संशयाची सुई फिरत असल्याने धनंजय मुंडेंचे विरोधक एकवटले असून, बरेच दिवस शांत असलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही विधिमंडळात पुन्हा एकदा ‘आका’ हा शब्द तोंडी आणून अप्रत्यक्षपणे मुंडेंना लक्ष्य करताना वाल्मिक कराडच्या नावाआडून डिवचलेही.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यामध्ये कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे पाटीलही भेटणार

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी मनोज जरांगे पाटील यांना या प्रकरणात लक्ष घालण्याविषयीचे आवाहन केल्यानंतर पाटील यांनी शुक्रवारी त्यांच्याशी संवाद साधला. प्रत्यक्ष भेटीला येणार असल्याचे सांगितले. पुणे दौऱ्यावरून निघाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांची मनोज जरांगे पाटील भेट घेणार आहेत. – गंगाधर काळकुटे, जरांगे पाटील यांचे सहकारी