दूध संघाच्या निवडणुकीत समर्थक पराभूत झालेल्या राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध वक्तव्य केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भुमरे यांच्या विरोधात दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करू, असं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलंय. सत्तारांच्या या वक्तव्यावर बोलताना भुमरे यांनीही टोलेबाजी केली. ‘मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. सत्तार यांनी शिवसेना आम्हाला सांगू नये, असे मत भुमरे यांनी व्यक्त केलं. तसेच पक्षप्रमुखांनी सांगितले तर पैठण मतदारसंघातूनही निवडणूक लढवावी, अशी तिरकस टिप्पणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या अध्यक्षपदी हरिभाऊ बागडेच राहतील, अशी घोषणा राज्यमंत्री सत्तार यांनी केली होती. दूध संघातील निवडणुकीनंतर अध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री सत्तार यांनी गोकुळसिंग राजपूत यांना उमेदवारी देण्याचे नक्की केले. आपल्या उमेदवारास पहिले अडीच वर्षे उपाध्यक्ष हवे असा त्यांचा आग्रह होता.

“राज्यमंत्री सत्तार यांची मंत्री भुमरे व बागडे यांच्यावर आगपाखड”

राज्यमंत्री सत्तार यांचे वाढत जाणारे आग्रह लक्षात घेता रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिलीप निरफळ यांना उमेदवारी दिली. निरफळ निवडून यावे यासाठी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी त्यांना साथ दिली. शिवसेनेचा उमेदवार म्हणून दिलीप निरफळ यांचे नाव निश्चित झाल्यानंतरही होणाऱ्या राजकीय घडमोडींची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर कानावर टाकण्यात आली. झालेल्या निवडणुकीत गोकुळसिंग राजपूत पराभूत झाले आणि राज्यमंत्री सत्तार यांनी मंत्री भुमरे व बागडे यांच्यावर आगपाखड केली.

हेही वाचा : VIDEO: पुण्यात राडा, शिवसैनिकांच्या धक्काबुक्कीत किरीट सोमय्या पडले पायरीवर

यानंतर सत्तार यांनी दूध संघातील भ्रष्टाचार काढू, रोजगार हमी योजनेतील रस्त्यांच्या कामातील अपहार बाहेर काढू, अशी वक्तव्ये केली. या शिवाय पैठण मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवार बदलावा, अशी मागणीही करणार असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे सत्तार यांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये असा थेट इशाराच भुमरे यांनी त्यांना दिला आहे. भुमरे यांनी दूध संघातील राजकारणाला सेनेतील वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली असल्याचा दावा केला. एकूणच दूध संघाच्या निवडणुकीमुळे सेना मंत्र्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute in two shivsena minister over election of milk cooperative society election pbs
First published on: 06-02-2022 at 00:07 IST