छत्रपती संभाजीनगर : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकास जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. हत्येच्या दिवशी मस्साजोगचे सरपंच देशमुख यांना कराड याने दिलेली धमकी, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची मागितलेली खंडणी आदी तपासातील बाजू राज्य गुन्हे अन्वेषण, विशेष तपास पथकाकडून न्यायालयात मांडण्यात आल्या.

खंडणीच्या आड संतोष देशमुख येत असल्यामुळेच त्यांना संपवण्यात आले का, असा संशय असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. कराडशी आरोपींचे केवळ फोनवरून संभाषण झाले. यावरून खुनाशी संबंध जोडून आणि मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला (पान ८ वर) (पान १ वरून) का, अशी विचारणा बीड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा पाटील यांनी तपास अधिकाऱ्यांना केला. त्यावर तांत्रिक पुरावे, फोनवरून झालेले संभाषण, ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या वेळी आरोपी विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांचे कराड याच्याशी झालेले संभाषण, हत्येच्या दिवशीही संतोष देशमुख यांना कराड याने दिलेली धमकी, विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मीक कराडने अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे दोन कोटींची मागितलेली खंडणी आदी तपासातील बाजू राज्य गुन्हे अन्वेषण, विशेष तपास पथकाकडून न्यायालयात मांडण्यात आल्या. वाल्मीक कराडची परदेशात कुठे कुठे मालमत्ता आहे, याचीही चौकशी करायची असल्याचे सरकारी पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले. वरील मुद्द्यांवरून वाल्मीक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती करण्यात आली. त्याला वाल्मीक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी विरोध केला.

हेही वाचा >>> छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

कराडच्या गावी आंदोलन

वाल्मीक कराडला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले. तत्पूर्वीच न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांना समर्थकांना पांगवण्यासाठी कसरत करावी लागली. तर, कराडच्या मूळ गावी पांगरी येथे महिलांनी रास्ता रोको केला. एक महिला आणि एका पुरुषाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परळीत अनेक भागांत दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला.

बीड, परभणीतील घटनांबाबत चौकशीला वेग

● बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी कुटुंबीयांनी आंदोलन केल्यानंतर हालचालींना वेग आला आहे.

● बीड आणि परभणी प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केल्यानुसार चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

● संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी यांची एक सदस्यीय समिती तर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी व्ही. एल. आचलिया यांची एक-सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

● संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती ताहलियानी समितीचे मुख्यालय हे बीड येथेच राहणार असून परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या तुरुंगातील मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती आचलिया यांच्या समितीचे मुख्य कार्यालय परभणी येथे राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● या समित्या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत सरकारला सादर करणार आहेत.