छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ ते ३० जून दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे.
यंदाही प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार नाही तर पदवीच्या गुणवत्तेवरच या सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले असले तरी अनेक पदवी अभ्यासक्रमांचे निकालच बाकी आहेत. निकालाला आणखी पंधरा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात येत असून, तत्पूर्वीच विद्यापीठाकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्याची घाई करण्यात आली आहे.
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसर येथील प्रवेशासाठी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांच्यासह प्रवेश समितीच्या सदस्यांनी वेळापत्रक तयार केले. संकेतस्थळावर पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागणार आहे.
खुल्या प्रवर्गासाठी नोंदणी शुल्क २०० तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये आकारण्यात येणार आहेत. ३० जूनपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणीचा डेटा विभागाकडे एक जुलै रोजी सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पाच जुलैपर्यत संबंधित विभागांत कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. ३१ जुलै रोजी थेट प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचा कार्यक्रम विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला आहे. परंतु, अद्यापही पदवीचे निकालच लागलेले नाहीत.
विद्यापीठाच्या एकूण ५१ पैकी परिसरात ४३ विभागात पीजीच्या एकूण ५४ अभ्यासक्रमांसाठी २ हजार २२८ प्रवेश क्षमता आहे. त्याशिवाय यावर्षी काही नवीन अभ्यासक्रम मंजूर झाले. तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र असे ६० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.