छत्रपती संभाजीनगर : उसाचा चोथा झाल्यानंतरच्या पाचटापासून (बगॅस) लेखणीतील पेनासाठीची शाई निर्माण होणाऱ्या प्रयोगाला स्वामित्त्व हक्क (पेटंट) मिळाल्यानंतर पूर्णपणे रसायनमुक्त आणि जलभेद्य (वाॅटरप्रुफ) असल्याचा दावा सांगण्यात येणाऱ्या या शाईचा उपयोग संगणकीय मुद्रण यंत्रातील कोरडी बुकटी (टोनर) म्हणूनही करण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहेत. या प्रयोगाचे संशोधक तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. बी. एन. डोळे यांनी ही माहिती दिली.
अलिकडेच डाॅ. डोळे यांच्या उसाच्या पाचटापासून तयार झालेल्या शाईच्या प्रयोगाला स्वामित्त्व हक्क मिळाले असून, त्याचे सूत्र गुजरातच्या एका कंपनीकडून मागण्यात आले आहे. या शाईच्या निर्मितीसाठी येथील पदार्थ विज्ञान विभागात जवळपास सहा वर्ष संशोधन सुरू होते. बाजारातील नामांकित कंपन्यांच्या पेनसाठी वापरण्यात येणारी शाई ही रसायनयुक्त असून, पाचटापासून (सोतरी) तयार झालेली शाई रसायनमुक्त आहे. शिवाय त्यांच्या किमतीपेक्षा कमालीची स्वस्तही आहे. एका नामांकित कंपनीची ३० मिली शाई १०० रुपयांना पडते तर आम्ही प्रयोगातून केलेली शाई ही ३० रुपयांनाच पडते.
गड्द निळ्या रंगाची या शाईच्या पेनाने लिहिलेल्या जागी पाणी पडले तरी अक्षरे पुसली जात नसून, लिहिताना बुडबुडेही निर्माण होत नसल्याचा दावाही डाॅ. डोळे करतात. त्यासाठीचे प्रात्यक्षिकही ते दाखवून देतात. एका संशोधनादरम्यान, ५ किलो पाचटाच्या प्रयोगावेळी ४० ग्रॅम गिआे ग्राफीन ऑक्साईड मिळाला. इथेनाॅल सल्फ्यूरिक ॲसिडमध्ये नैसर्गिक घटक टाकल्यानंतर बुकटी खाली गेल्याचे निदर्शनास आले. या ५ ग्रॅम बुकटीतून ५०० मिली शाई निर्माण होते. शाई तयार होणाऱ्या बुकटीचा उपयोग संगणकाच्या मुद्रण यंत्रासाठी व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डाॅ. डोळे यांनी सांगितले.
भौतिकशास्त्र विषयाचे अभ्यासक असलेले डाॅ. डोळे यांनी त्यांच्या वरील शाईच्या प्रयोगाला स्वामित्त्व हक्क मिळवण्यासाठी एप्रिल २०२४ मध्ये नोंदणी केली होती. अखेर त्याला स्वामित्त्व हक्क मिळाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आणि विद्यापीठाच्या अनेक विभागात या शाईचा वापरही सुरू केला आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागात सध्या लेखनासाठीची शाई ही डाॅ. डोळे यांच्या प्रयोगातून तयार झालेलीच वापरली जात आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रत्येक कागदोपत्रीचा व्यवहारावरील स्वाक्षरी प्रयोगातून सिद्ध झालेल्या शाईनेच केली जाते, असे संशोधक डाॅ. डोळे यांनी सांगितले.
