छत्रपती संभाजीनगर – बीड नगर परिषदेच्या वसुली विभागात कार्यरत असलेले अविनाश धांडे ७ नोव्हेंबर रोजी रात्री कार्यालयाच्या छतावरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळून आले. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ही घटना समोर आली. आत्महत्या करणारे अविनाश धांडे यांनी एक नोंद मोबाईल फोनमध्ये केलेली असून त्यामध्ये चार अधिकाऱ्यांची नावे लिहून वेळोवेळी पदोन्नतीपासून डावलल्यासह अनेक आरोप केलेले आहेत. शिवाय मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना कुटुंबाविषयी एक भावनिक पोस्टही लिहिलेली आहे.

या घटनेमुळे बीड शहरात खळबळ उडाली असून पोलीस काय भूमिका घेतात आणि याप्रकरणी तक्रार काय पुढे येते याकडे लक्ष लागले आहे.
वसुली विभागात कार्यरत असलेले अविनाश धांडे यांचा शुक्रवारचा घटनाक्रम समोर आला असून, दिवसभर कार्यालयाच्या परिसरातच बसलेले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी एका झेरॉक्स दुकानात बसून चहाही घेतला. या दरम्यान धांडे हे तणावातच असल्याची माहिती समोर आली. रात्री धांडे हे घरी परतले नाहीत. त्यांच्या शोधात नातेवाईक फिरत होते. विविध ठिकाणी शोध घेऊनही धांडे सापडले नाहीत. अखेर शेवटी छतावर गेल्यानंतर अविनाश धांडे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. या प्रकरणाची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पंचनामा आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवणे या प्रक्रिया करण्यात आल्या.

अविनाश धांडे यांनी तत्कालीन एका मुख्याधिकाऱ्यासह वसुली विभागातील अन्य दोन अधिकारी व अन्य एका बड्या अधिकाऱ्यावर अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यास पदोन्नती देऊन ज्येष्ठता न पाहता त्यांना डावलणे, शासकीय अहवालावर कमी गुण देणे तर एका अधिकाऱ्याने वागणुकीचा गैरफायदा घेणे, आदी गंभीर आरोप केले आहेत.

याप्रकरणाविषयी बीड शहर पोलिसांनी सांगितले की, रविवारी सकाळपर्यंत कुठलीही तक्रार पुढे आली नसल्याने अद्याप नवी काही माहिती नाही. अविनाश धांडे हे कौटुंबीक स्तरावरूनही तणावात होते, काही वाद होते, अशी एक प्राथामिक माहिती आहे.