औरंगाबाद – वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगरातील कमलापुरात एका व्यक्तीवर दोघांनी गोळीबार व तलवार हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता घडली असून मध्यरात्री १२ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.
या घटनेमध्ये सागर सुभाष सदार हा तरुण जखमी झाला आहे. तर गजू मोरे याने सागरच्या दिशेने गावठी कट्टा चालवला व प्रभु चव्हाण याने लाथाबुक्क्याने मारून तलवार हल्ला करून सागर यास जखमी केले. सागरला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त उज्ज्वला वनकर, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे हे रात्री घाटी रुग्णालयात दाखल झाले होते.




या प्रकरणी सागर सुभाष सदार याने फिर्याद दिली. फिर्यादीवरून गजू मोरे व प्रभू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी हे एकाच समुदायातील आहेत, असे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी सांगितले.
गोळीबारामागचे कारण
आरोपी गजू मोरे याच्या बहिणीने गायकवाड नावाच्या व्यक्तीमुळे एक वर्षांपूर्वी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद असून गायकवाड यास अटकही झाली होती. परंतु फिर्यादी सागर सदर यांच्या बहिणीचा मित्र वसंत आवटे याने चुकीची साक्ष दिल्याने गायकवाड सुटला होता. सागर हा गायकवाड याच्याशी बोलत होता हे गजूला आवडत नव्हते. गजू हा सागरला गायकवाडसोबत बोलू नकोस, असे सांगायचा. परंतु सागर यांनी ऐकले नाही या कारणावरून गजू याने भांडण केले व त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्याने सागरला जखमी केले. तसेच गजू मोरे याचा मित्र प्रभू चव्हाण यांनी तलवारीने व लाथावुक्याने सागर यास मारहाण केली.