महाराष्ट्र बँकेतून २७ कोटी रुपये लबाडीने हस्तांतरित

नोटाबंदीनंतर रोकडरहित व्यवहार वाढावेत, यासाठी विकसित करण्यात आलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या अ‍ॅपच्या माध्यमातून औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र बँकेच्या बंद खात्यातून २६ कोटी रुपये लबाडीने इतर खात्यांत वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले असून, करमाड, जालना शहर व लातूरमध्येही हेच अ‍ॅप वापरून रक्कम वर्ग करण्यात आली आहे. तर, भाईंदर येथील महाराष्ट्र बँकेचीही अशाच रीतीने १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मोबाइलवर यूपीआय अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर अन्य खात्यातून पैसे मिळविण्याची विनंती केली की त्यावर तुमचा मोबाइल नंबर मागितला जातो. हा नंबर बँकेच्या खात्याशी संलग्न असेल तर त्यातून एका वेळेला एक लाखापर्यंतची रक्कम काढता किंवा वळवता येते. अशा पद्धतीने दुसऱ्याचा मोबाइल क्रमांक वापरून केलेला हा घोटाळा पहिल्यांदा औरंगाबाद येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. त्यानंतर वेगवेगळय़ा लोकांनी फसविले असल्याची तक्रार महाराष्ट्र बँकेने दिल्यानंतर औरंबादमधील ही फसवणूक साडेनऊ कोटीपर्यंत गेली. अन्यत्र बँक ऑफ महाराष्ट्रच्या बंद खात्यातून २६ कोटी रुपये वळविण्यात आले आहेत. ही फसवणूक केवळ एका बँकेपुरती नसून सर्व बँकांच्या फसवणुकीचा आकडा ७५ कोटींपर्यंत असू शकतो, असा दावा बँकेतील कर्मचारी करत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रशिवाय अन्य बँकांनी मात्र अजून तक्रारी केलेल्या नाहीत. दरम्यान, या अनुषंगाने ‘लोकसत्ता’मध्ये आलेल्या वृत्ताच्या आधारे लोकसभेत सोमवारी शून्य प्रहरात खासदार हरिशचंद्र चव्हाण यांनी हा प्रश्न संसदेत मांडला.

ज्यांचा मोबाइल वापरला त्यांना ही रक्कम मिळाली असल्याचे गृहीत धरून ८४ जणांना आरोपी करण्यात आले आहे. पण काही प्रकरणात दुसऱ्याचा दूरध्वनी घेऊन ही रक्कम वळविण्यात आल्याचेही प्रकार समोर आले आहेत. ज्यांच्या खात्यात रक्कम नाही, किंवा ज्यांचे खाते बंद आहे, अशा खात्यातून रक्कम वळत्या कशा झाल्या असे आता बँकांकडूनच विचारले जात आहे. बँकेच्या नावावर पेमेंट कार्पोरेशनने ही रक्कम वळविल्यामुळे हा घोटाळा समोर आला आहे. राज्यभर या अ‍ॅपचा गैरवापर झाला असावा, अशीही शक्यता आहे.

भाईंदरमध्ये बँकेच्या १८ खातेदारांनी खात्यात रक्कम नसतानाही अज्ञात व्यक्तीच्या मदतीने संगणक प्रणाली हॅक करुन २६ डिसेंबर ते १८ जानेवारी या कालावधीत बँकेच्या १ कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची तक्रार महाराष्ट्र बँकेच्या उपव्यवस्थापकांनी नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या १८ खात्यांतून २१ आरोपींच्या विविध बँक खात्यांत १४२ व्यवहारांच्या मदतीने १ कोटी ३४ लाख ९० हजार रुपये जमा झाले असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. मोबाइल अ‍ॅप्लीकेशनमधील ‘रक्कम मागविणे’ या पर्यायाचा वापर करुन आरोपींनी बँकेची फसवणूक केली आहे.

आरोपींनी ‘रक्कम मागवणे’ ही सूचना मोबाइलवर आली असता तिचा स्वीकार केला. ते करताना संबंधित मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी रक्कम आपल्या खात्यात नसल्याची पूर्णपणे जाणीव त्यांना होती. रक्कम खात्यात नसतानाही आणि यूपीआय अ‍ॅपद्वारे कोणताही अवरोध न होता ही रक्कम हस्तांतर होत आहे याची कल्पना असतानाही फसवणूक करणाऱ्यांनी त्याचा वारंवार वापर केला, असे बँकेच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

बँकेच्या मुंबईतील कार्यालयात संपूर्ण संगणक प्रणाली बसविण्यात आली असून याच ठिकाणी बँकेचे पुल खाते आहे. फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात रक्कम नसल्याने त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम या पुल खात्यातून गेली असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या प्रकाराची बँकेकडून तपासणी करण्यात आली असता फसवणूक करणाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीची मदत घेतली आणि संगणक प्रणाली हॅक करुन हा प्रकार घडवून आणण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १८ बँक खातेदारांना नोटिसा बजावून बँकेने खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यातील एका खातेदाराने केवळ दोन लाख रुपयेत बँकेत जमा केले आहेत. त्यामुळे अखेर बँकेने याप्रकरणी २१ लाभार्थी आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

चुकीच्या अ‍ॅपकडे बोट

या प्रकरणात औरंगाबादमध्ये आजवर ८४हून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरातील तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. बंद खात्यातून रक्कम वर्ग झाल्याने बँकेचे अधिकारीही हैराण झाले आहेत. पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने इन्फ्राटेक या कंपनीला हे अ‍ॅप तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी चुकीचे अ‍ॅप तयार केल्याने हे सारे घडत आहे, असे महाराष्ट्र बँकेतील अधिकारी सांगतात.