छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्यातील परंडा आणि भूम तालुक्याला ढगफुटी सदृष्य पावसाचा फटका बसला. आजही अनेक गावांचा संपर्क तुटलेलाच आहे. आता काही गावातील पाणी उतरू लागले आहे. अनेक भागातील खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान गोदावरीतून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविण्याची वेळ आली आहे.

परंडा तालुक्यातील रुई या गावात मुख्यमंत्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून भूम तालुक्यातील पाथ्रुड, कळंब तालुक्यातील आथर्डी येथील पाहणीनंतर ते हेलिकॉप्टरने सोलापूरकडे जाणार आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री प्रताप सरनाईकही असतील. देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे अतिवृष्टीतील बाधितांना अधिकची मदत मिळावी या मागणीने जोर पकडला आहे.

सांगलीच्या पूर हाताळताना जो आर्थिक निकष वापरण्यात आला होता तोच निकष मराठवाड्यासही लावा, अशी मागणी केली जात आहे. अनेक गावातील शेतातून माती खरवडून गेली आहे. अनेक भागातील पिके अक्षरश: गुडघ्या एवढ्या पाण्यात उभी आहेत. यामुळे पिकांचे मुळे सडतील आणि हाती काही येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कोणत्या घोषणा होणार याची उत्सुकता सर्वत्र आहे.

विरोधकांचेही दौरे

एका बाजूला मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री, पालक सचिव यांना अतिवृष्टीच्या पाहणीस जाण्याचे आदेश दिलेले असताना काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हेही मराठवाड्यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी ते छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा भागात पाहणी करतील असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी खासदार कल्याण काळे, अनिल पटेल, राजेद्र राख, राजेंद्र राठोड व लहू शेवाळे यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने नुकसानीची पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी. या शिष्टमंडळासह कॉग्रस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे राज्यपालांच्या भेटीस जाणार आहेत.

जायकवाडीतून पुन्हा विसर्ग वाढणार

जायकवाडी धरणात नाशिक जिल्ह्यातील पावसाने पुन्हा पाणी वाढले आहे. धरणामध्ये विविध स्रोतातून ४५ हजार दशलक्ष लिटर प्रतिसेकंद वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जायकवाडीतून पाणी सोडावे लागणार आहे. सिंदफणा आणि गोदावरी यांच्या संगमाच्या ठिकाणी त्यामुळे अडचणीत वाढ होऊ शकते. बुधवारी पावसाचा जोर थांबला आहे. पुढील दोन दिवसात तातडीने पाणी पुरवठा आणि आरोग्याचे प्रश्न हाताळणे ही प्रशासनाचा प्राध्यान्यक्रम असेल असे सांगण्यात आले.