छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातत पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आलेला आहे. मांजरा, सिंदफणा प्रकल्पांचे दरवाजे उघडले असून, बाणगंगेसह अनेक लहान, मोठ्या नद्यांना पूर आला आहे. भूममध्ये बाणगंगेला आलेल्या पुरामध्ये एक महिला वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सायंकाळी तासभर जोरदार वृष्टी झाली. रविवारी रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, सोमवारी पहाटेपासून जोर वाढला आहे. अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
जालना जिल्ह्यातील जालना व बदनापूर तालुक्यातही अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर व अन्य काही तालुक्यातही पावसाचा जोर वाढला असून, सिंदफणा नदीचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. केजपासून जवळ असलेल्या मांजरा प्रकल्पाचे ६ दरवाजे उघडले असून, पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
धाराशिवमधील भूम-परंडा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, बाणगंगा नदीला पूर आला आहे. बाणगंगा नदीत भूम परिसरातील एक महिला वाहून गेली आहे. या महिलेचा शोध सुरू आहे. परंड्यातील चांदणी नदीने रौद्ररूप धारण केले असून, परिसरातील गावांमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात पिके पुन्हा पाण्याखाली गेले असून, सोयाबीनची पाने पिवळी पडू लागले आहेत. सततच्या पावसाने शेतातील पाणी हटण्याचे नाव घेत नसून, शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगामच अडचणीत सापडला आहे.
मराठवाड्यातील ७५ मंडळांमध्ये अतिवृष्टी
मराठवाड्यातील ७५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सर्वाधिक अतिवृष्टीची नोंद बीडमध्ये असून, तेथील २९ मंडळांमध्ये तशी नोंद झाली आहे. धाराशिवमधील २२, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ मंडळांमध्ये, जालन्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी, नांदेड, हिंगोलीतील काही मंडळांमध्ये तुफान पाऊस झाला आहे.
वाशीमध्ये एनडीआरएफचे पथक
धाराशिवच्या वाशीमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकाला वाशीमध्ये पाचारण करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वीही वाशीमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, अलिकडच्या काळातील आजपर्यंतचा सर्वाधिक पाऊस मानला जात आहे.