सुहास सरदेशमुख

औरंगाबाद शहरातील ब्रीजवाडी ही तशी अल्प उत्पन्न गटातील लोकांची वस्ती. मात्र, या वस्तीमध्ये दररोज ४० हून अधिक रुग्ण तपासणीसाठी येतात. गेल्या काही दिवसांत सर्दी, पडसे आणि ताप असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे संत गाडगेबाबा आरोग्य केंद्राचे डॉ. प्रसाद वाईकर यांनी सांगितले.

एखाद्या वस्तीमधील तपासणी केंद्रातील डॉक्टरांकडे कोणत्या सुविधा असतील, असा प्रश्न कोणालाही पडू पडेल, पण डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने पाच आरोग्य केंद्रांच्या मदतीने ३० वस्त्यांमध्ये रुग्ण तपासले जात आहेत. एका बाजूला लपून बसणारे रुग्ण असले तरी वस्त्यांमध्ये मात्र, ‘आम्हाला तपासा’ असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

मुंबईतील धारावीमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर छोटय़ा शहरातील वस्त्यांची काळजी कोण घेणार, हा नवा प्रश्न समोर आला आहे. वस्ती हाच कामाचा गाभा मानून औरंगाबाद शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या वतीने शहरातील जवळपास ३० वस्त्यांमध्ये उभे केलेले काम महत्त्वपूर्ण ठरू लागले आहे.

रेल्वे स्थानकाजवळील मिलिंदनगर येथे लहुजी साळवे आरोग्य केंद्र येथे डॉ. दिवाकर कुलकर्णी, मुकुंदवाडी येथे संत रोहिदास आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान ४० ते ५० रुग्णांची डॉक्टर तपासणी करतात. सर्वसाधारणपणे सर्दी झाल्यानंतर घाबरून जाण्याचे प्रकार आता वाढले आहेत, असे निरीक्षण डॉ. वाईकर नोंदवितात.

डॉ. प्रतिभा फाटकही वाईकर यांच्याप्रमाणेच काम करतात. त्या सांगत होत्या, आम्हाला विप्रो कंपनीकडून ‘पीपीई’ मिळाले. त्यामुळे डॉक्टर पूर्णत: काळजी घेऊन वस्तींमध्ये काम करत आहेत. एखाद्या रुग्णास श्वसनास अडथळा होत असेल तर शासकीय कोविड रुग्णालयात जाण्याचा सल्लाही दिला जातो. रुग्णांचा कोठे प्रवास झाला होता का किंवा त्यास दमा आहे का, याची विचारणा केली जाते, पण आता येणाऱ्या रुग्णांमध्ये दहा टक्के रुग्ण हे घाबरून गेलेले असतात.

वस्त्यांमध्ये आरोग्याची जाणीव विकसित करण्यावर गेले अनेक दिवस शहरातील काही डॉक्टर आवर्जून काम करीत आहेत. कोविड-१९ ची लागण होऊ नये म्हणून येणाऱ्या रुग्णांचे हात सॅनिटायझरने धुऊन घेतले जातात. त्याचबरोबर औषधी देणाऱ्यास पीपीई उपलब्ध आहेत.

कोणत्याही शहराभोवतीच्या वस्त्यांमध्ये योग्यप्रकारे काळजी घेऊन काम करणारी मंडळी असतील, तर साथ रोखण्याचे काम होऊ शकते, असे सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळामध्ये काम करणाऱ्या डॉक्टराचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात अधिक जागृती!

औरंगाबाद शहराच्या सभोवतालच्या परिसरात काम करणाऱ्या डॉ. अपर्णा लाहोटी म्हणाल्या की, ‘‘ज्या गावांमध्ये कोणतीही वैद्यकीय सेवा नाही, अशा दोन गावांमध्ये दररोज आम्ही भेटी देत आहोत. ग्रामीण भागातील मंडळी शहरी मंडळींपेक्षा अधिक जागृत आहेत. बहुतांश ठिकाणी अंतर राखूनच व्यवहार होत आहेत.’’