छत्रपती संभाजीनगर – मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या ३६ वर्षीय तरुणाने पाचवेळा कळसुबाईचे शिखर सर केल्यानंतर आफ्रिकेच्या टांझानियातील किलीमांजरो या तब्बल पाच हजार ८९५ मीटर उंचीच्या शिखरावर उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात चढाई करून शिवजयंतीच्या दिवशीच एक ‘कळसाध्याय’ रचला. एका अनोख्या ध्येयासक्तीची प्रचिती देण्यासह तरुणाईला प्रेरणादायी ठरणाऱ्या या तरुणाचे नाव दीपक भगवानराव गायकवाड आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्यानंतर सर्वाधिक उंचीपैकीचे एक शिखर सर करणारे दीपक भारतातील कदाचित गिर्यारोहक म्हणून एकमेव असण्याची शक्यता आहे.
जगातील सात खंडांतील सर्वोच्च शिखर म्हणून किलीमांजरोची ओळख आहे. त्यावर चढाई करण्यासाठी दीपक हे छत्रपती संभाजीनगरमधून ११ फेब्रुवारीला निघून मुंबई, केनिया मार्गे टांझानियात पोहोचले. तत्पूर्वी त्यांनी प्रकृतीच्या संदर्भाने सर्व चाचण्या पूर्ण करून घेतल्या. प्रत्यारोपण केलेले डाॅ. सचिन सोनी यांच्याकडूनही प्रकृतीचा अंदाज घेतला. १९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता किलीमांजरो शिखर सर केल्याची माहिती दीपक व त्यांचे मित्र तथा पोलीस विभागातील पहिले एव्हरेस्टवीर रफीक शेख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
हेही वाचा – माजी राज्यमंत्री रजनी सातव यांचे निधन
दीपक यांनी सांगितले की, “यापूर्वी कळसूबाईचे शिखर पाचवेळा सर केले. हरिहर गड, रायगड, राजगड, हरिश्चंद्र गड, तोरणा, सिंहगड, पुरंदर किल्ला सर केला आहे. किलीमांजरोसाठी मागील तीन वर्षांपासून तयारी करत होतो. आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. परंतु अनोखा कळसाध्याय रचण्याचे एक ध्येयच मनी असून ते स्वस्थ बसू देत नव्हते. मोहिमेकडे काहींकडे मदत मागितली. अखेर ती वेळेत मिळाली नाही. शेवटी वैयक्तिक कर्ज काढले. मोहिमेसाठी साडेतीन लाखांचा खर्च आला. उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात व अधून-मधून हलका पाऊस बरसत असताना चढाई केली, याचा मनस्वी आनंद आणि समाधान वाटतेय.”
दीपक गायकवाड हे मूळचे सेलू तालुक्यातील. त्यांच्या आई विमल गायकवाड म्हणाल्या, आई म्हणून माझा त्यांना काळजीपोटी विरोध होता. पण ते ऐकले नाही. आज शिखर सर केल्याचे वृत्त ऐकले. समाधान, आनंद वाटला. आम्ही मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातील.”
हेही वाचा – नांदेड : मराठा आंदोलन पेटले; आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वाहनाची तोडफोड
दीपक यांच्या आईनेच त्यांना किडनीदान केली आहे. दीपक यांच्या पत्नी गृहिणी असून त्यांना बारा वर्षांचा एक मुलगा आहे. एव्हरेस्टवीर रफिक शेख यांनी सांगितले की, दीपक यांच्या मोहिमेसाठी छत्रपती संभाजीनगरमधील ड्रीम ॲडव्हेंचर्स या संस्थेचे सहकार्य व योगदान महत्वाचे ठरले. प्रमोद ताकवले व संजय रोडगे यांचेही सहकार्य व पाठबळ मिळाले.
दीपक गायकवाड यांच्यावर १७ ऑगस्ट २०१८ रोजी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. तत्पूर्वी त्यांना डायलिसीस करावे लागले. त्यांच्या आईची किडनी जुळून आली. रक्तदाबाचाही त्रास होता. परंतु किलीमांजरोवर चढाईपूर्वी त्यांनी वैद्यकीय सल्ला व प्रकृतीचा अंदाज घेतला होता. – डाॅ. सचिन सोनी, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ.