छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील नांदर महसूल मंडळातील अनेक गावांमध्ये दिवाळीतील चारही दिवस आतषबाजी सोडाच, फटाक्याचा एक आवाजही कानी पडला नाही. अवघे वातावरण जणू घरातलं कोणी मृत्यू पावलेय, असे सूतकी सावटाचे राहिले. दरवर्षी आवर्जून फटाके वाजवणारे शहादेव त्रिंबकराव सुरासे यांना ‘काका’ म्हणणारी त्यांची मुले आणि पुतणेही, ‘काका, यंदा तुम्ही फटाक्यांना हातही लावला नाही’ म्हणताच शहादेव यांना गलबलून आले !
नांदर मंडळामध्ये ऐन दिवाळीतही पाऊस झाला. लक्ष्मीपूजनासह भाऊबीजेच्या दिवशीही पावसाचीच बरसात झाली. तत्पूर्वी नांदर मंडळात १४ सप्टेंबरला १२४.५ मिमी व २३ सप्टेंबरला तब्बल २१९ मिमी एवढी मोठी अतिवृष्टी झाली. अवघ्या दहा दिवसांच्या फरकातच दोन अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके हातची गेली. तूर तर अक्षरशः पाणी साचल्याने मुळासकट जळून गेली. गावात अवघी २ टक्केच तूर तरली, असे शहादेव सांगतात.
पैठण तालुक्यात १९० गावांतील ७ हजार २०० हेक्टर जिरायत, २४४ बागायत व १६ हजार ३० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, शासनाकडे १०१ कोटींचे अनुदान मागण्यात आले आहे, असे तहसीलदार ज्योती पवार यांनी माध्यमांना सांगितले. मात्र, शासनाने मंजूर केलेल्या अनुदानापैकी एक पैसाही दिवाळीत मिळाला नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाचे कुठलेही नुकसान भरपाईचे अनुदान दिवाळीत मिळाले नसल्याचे शहादेव सुरासे यांनी सांगितले.
नांदूर मंडळातील शेतकरी अतिवृष्टीतून वाचलेला कापूस विक्री करून तात्पुरती दिवाळी साजरी करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, त्या आशेवरही दिवाळीतील पावसाने पाणी फेरले. यंदा आधीच उत्साह नव्हता. त्यात पुन्हा ऐन दिवाळीत पाऊस झाला. कापूस भिजला. दिवाळीचा सण काटकसरीतून आणि पोराबाळांसाठी साजरा केल्यासारखा दाखवावा लागला. फटाक्यांचा आवाज म्हणून ऐकल्याचे आठवत नाही. आपल्याला पुतण्यांसह मुलेही काका म्हणूनच संबोधतात. काका, यंदा फटाक्याला हातही लावला नाही, असे म्हणताच गलबलून आले, असे सुरासे म्हणाले.
