छत्रपती संभाजीनगर : देशातील सर्वाधिक १०.९५ लाख सोयाबीनची साठवण केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने समृद्धी महामार्गावरील राज्यातील पहिला ‘ॲग्रो लॉजिस्टिक हब’ पूर्ण करण्यात आला आहे. लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वैजापूरमध्ये १० हजार टनाचे वातानुकूलित धान्य साठवणुकीच्या टाक्या अर्थात सायलो उभ्या केल्या आहेत. वातानुकूलित धान्य साठवणुकीचे सायलो, धान्य श्रेणी निर्धारणासाठी यंत्रणा आणि मालवाहतुकीची व्यवस्था आणि पेट्रोल पंप अशा सुविधा ४० कोटी रुपयांमधून उभ्या करण्यात आल्या आहेत.
समृद्धी महामार्गावरून शेती वाहतूक वाढावी असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी सांगितले होते. जांबरगाव येथे असा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात तीन हजार टन क्षमतेची दोन गोदामे उभी करण्यात आली आहेत. या योजनेकरिता केंद्र सरकारकडून ३२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले असून, उर्वरित खर्च वखार महामंडळाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लातूर येथे सोयाबीन लॉजिस्टिक हब
लातूर हा सोयाबीन उत्पादनातील अग्रेसर जिल्हा असून, सोयाबीनच्या दरातील चढउतार लक्षात घेता साठवणुकीची सोय व्हावी म्हणून लातूर येथे सोयाबीन लॉजिस्टिक हब उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २५०० टन वातानुकूलित धान्य साठवणुकीच्या टाक्या, १० हजार टनाचे अत्याधुनिक गोदामे करण्याचे प्रस्तावित आहे. सोयाबीन साठवणुकीसाठी उदगीर येथे ३६०० टनाचे, तर रेणापूर येथे ४५०० टनाचे गोदाम करण्यात आले असून, औसा, पानगाव, जिंतूर, सेलू येथे गोदामे उभी केली जात आहेत.
असा आहे प्रकल्प
१० हजार टन क्षमतेची सोयाबीन साठणुकीची अत्याधुनिक गोदामे, तेवढ्या क्षमतेचे सायलो, सीसीटीव्ही, अग्निशामक यंत्रणा असे प्रकल्पाचे स्वरूप आहे. या प्रकल्पाशिवाय सिल्लोड, लोहा, किनवट, माहूर येथेही गोदामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे धान्य साठवणक्षमता वाढली आहे.
राज्यातील धान्य साठवणूक क्षमता दिवसेंदिवस वाढत आहे. जांबरगावमध्ये राज्यातील पहिले कृषी लॉजिस्टिक हब आता पूर्ण झाले आहे. जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने समृद्धी महामार्गावर अजूनही काही ठिकाणी अशी साठवणूक केंद्रे वाढवणार आहोत. लातूर येथे सोयाबीन साठवणुकीसाठी प्रस्ताव तयार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. – कौस्तुभ दिवेगावकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य वखार महामंडळ